कोल्‍हापूर : अल्‍पवयीन मुलीवर मुंबईतील पोलिसाचा अत्‍याचार | पुढारी

कोल्‍हापूर : अल्‍पवयीन मुलीवर मुंबईतील पोलिसाचा अत्‍याचार

पन्हाळा ; पुढारी वृतसेवा : कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील अल्‍पवयीन मुलीवर मुंबईतील पोलिसाचा अत्‍याचार झाल्‍याची घटना समोर आली आहे. नात्यातील अल्पवयीन मुलीवर प्रेमाचा बनाव करत तिच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवल्‍याने संबंधीत मुलगी गरोदर राहील्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिस स्‍टशेन मध्ये मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई असलेल्या राजेंद्र गणपती पाटील याला पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरा पन्हाळा पोलिसात या बाबत रीतसर गुन्हा नोंद झाला आहे. अल्‍पवयीन मुलीवर मुंबईतील पोलिसाचा अत्‍याचार झाल्‍याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न

पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील एका गावातील इयत्‍ता दहावी मध्ये शिकत असलेल्‍या मुलीला गेल्‍या दोन महिन्यांपासून त्रास होत होता. अल्पवयीन मुलीला दोन महिन्यांपासून त्रास होत असल्याने कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखवले. त्‍यामध्ये मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे तिच्याकडे चौकशी केली असता, सदर मुलीच्या चुलत अत्तीचा नवरा असलेल्या व मुंबईत पोलीस दलात असलेल्या राजेंद्र याने पीडित मुलीला तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत गावातील एका घरात जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. या बाबत कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी देखील दिल्‍याचे पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले.

पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा

मुलीला दोन महिने शारीरिक त्रास सुरू झाल्यामुळे तिच्या वडिलांनी तीला दवाखान्यात दाखवले. यामध्ये ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. सदर पीडित मुलीने कोल्हापूर येथील पोलीस चौकीत या बाबत जबाब नोंदवला असून, पन्हाळा पोलिसात सदर बाब वर्ग करण्यात आल्या नंतर पन्हाळा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. कोल्हापूरातील दवाखान्यात पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत.

तिथे या मुलीच्या वडिलांचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला होता. दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. पन्हाळ्यात रात्री या गुन्हाची नोंद होऊन देखील पोलीस माहिती देत नव्हते. गुन्हा 12 ऑक्टोबर रोजी नोंदवला. मात्र या बाबत माहिती दिली जात नव्हती. चार दिवसांपासून तपास सुरू आहे असे बोलले जात होते. रात्री उशिरा संशयीत आरोपी राजेंद्र पाटील याला पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे.

संशयीत आरोपीला आज न्यायालयात दाखल केले जाणार

आज त्याला न्यायालयात दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पन्हाळा पोलिसात बालकांचे लैंगिक शोषण व अत्याचार सरंक्षण कायदा नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Back to top button