कोल्हापूरकरात वाढतेय सायबेरियन हस्की अन् रॉटविलरची क्रेझ
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हौसेखातर किंवा संरक्षणाच्या कारणास्तव श्वान पाळण्याची क्रेझ गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. पाळीव प्राण्यांमध्ये विशेषतः श्वान त्याच्या मालकासाठी आणि कुटुंबासाठी भावनिक आधार असतो. त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये श्वान पाळण्याची जणू क्रेझच तयार झाली आहे. अगदी लॅब—ाडॉर, मुधोळ हाऊंडपासून ते सायबेरियातील हस्कीपर्यंत सर्व जातीचे श्वान कोल्हापुरात पहायला मिळतात.
सध्या शहरातील गल्लोगल्ली सायबेरियन हस्की, ग्रेटडेन, बुलडॉग, जर्मन शेफर्डची क्रेझ पहायला मिळत आहे. श्वान प्रेमींच्या या वाढत्या प्रतिसादामुळे श्वानांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायाची उलाढाल लाखोंच्या घरात आहे. कोल्हापूरकरांच्या या श्वान प्रेमामुळे शहरात श्वानांसाठी शाळा ही खुल्या झाल्या असून त्यांच्यासाठी हॉस्टेल्सदेखील तयार झाली आहे.
शहरात सध्या श्वानांचे विदेशी, देशी प्रकारच्या 50 हून अधिक जाती असतील, असे कविता रेणोशे यांनी सांगितले. यामध्ये वर्किंग डॉग, स्पोर्टस् आणि टॉय असे प्रकार आहेत. वर्किंग डॉग हे मोठ्या ब—ीडचे, स्पोर्टस् डॉग हे मध्यम तर टॉय डॉग लहान ब—ीडचे असतात. याशिवाय बुलडॉग, जर्मन शेफर्ड, ग्रेटडेन, लँब—ाडॉर, पग, गोल्डन रिट्रीव्हर, कॉकर स्पॅनियल, सेंट बेनॉर्ड, डॉबरमन, डालमेशन, बॉर्डर कोली, सायबेरियन हस्की, सेत्झु, पामेरियन, मिनीएचर पिचर सारख्या श्वानांच्या जातीदेखील आता कोल्हापुरात उपलब्ध आहेत. काही – काही श्वानांच्या किमती तीन ते चार लाखांच्या घरात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुट्ट्यांच्या हंगामात डॉग हॉस्टेलमध्ये गर्दी
परगावी किंवा परदेशात जाताना आपल्या श्वानाला ठेवणार कुठे?, अपघातानंतर त्याच्या देखभालीसाठी त्याला कोठे ठेवायचे?, असा प्रश्न श्वानप्रेमींना पडतो. हीच गरज लक्षात घेऊन कोल्हापुरातील काही श्वानप्रेमी तरुणांनी विविध ठिकाणी डॉग हॉस्टेल सुरू केले आहेत. राजारामपुरी आणि वडणगेतील डॉग हॉस्टेलमध्ये गेल्या महिन्याभरात हजाराहून अधिक श्वान दाखल झाले होते. येथे श्वानांची सर्व देखभाल केली जाते.
मोफत भरतेय श्वान शाळा
सिध्दगिरी मठावर भटक्या कुत्र्यांसाठी श्वान शाळा बांधली आहे. येथे भटक्या कुत्र्यांना दोन वेळच जेवण दिले जाते. तसेच अपघातात जखमी झालेल्या श्वानांवर उपचारही केले जातात. या श्वान शाळेत 400 श्वानांची राहण्याची सोय केली आहे. ही सर्व सेवा मोफत केली जाते.
श्वानांचे प्रकार
देशी श्वानांच्या जाती : चिप्पीपराय, मुधोळ हाउंड, कारवान हाऊंड, पश्मी, राजपालायम, भारतीय स्पीट्झ, कन्नी, गड्डी
विदेशी श्वानांच्या जाती : बुलडॉग, जर्मन शेफर्ड, ग्रेटडेन, लँब—ाडॉर, पग, गोल्डन रिट्रीव्हर, कॉकर स्पॅनियल, सेंट बेनॉर्ड, डॉबरमन, डालमेशन, बॉर्डर कोली, सायबेरियन हस्की, सेत्झु, पामेरियन, मिनीएचर पिचर.