कोल्‍हापूर : महापालिका निवडणुकीसाठी ८१ प्रभाग, बहुसदस्य प्रभाग रचना, लवकरच बिगूल | पुढारी

कोल्‍हापूर : महापालिका निवडणुकीसाठी ८१ प्रभाग, बहुसदस्य प्रभाग रचना, लवकरच बिगूल

कोल्हापूर : सतीश सरीकर मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आदेश लागू होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतही आता ९२ ऐवजी नगरसेवकांची संख्या ८१ राहणार आहे. त्याबरोबरच निवडणूक बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार होणार असून ३ किंवा ४ नगरसेवकांचा एक वॉर्ड असेल. ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर महापालिका निवडणूकीचा बिगूल वाजेल.

कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार डिसेंबर २०२० पासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी एक सदस्य प्रभाग रचना आणि ८१ नगरसेवक संख्या यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार याद्या जाहीर करणे आदी कामे पूर्ण झाली होती. मात्र मार्च २०२१ मध्ये कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली.

महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर २०२१ मध्ये बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिकेला दिले. ७ ऑक्टोबर २०२१ कोल्हापूर शहरातील ८१ प्रभागासाठी प्रत्येकी ३ नगरसेवकांचा एक असे २७ प्रभाग निश्चित करण्यात आले. प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडतही काढण्यात आली. परंतू पुन्हा निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारने २०११ नंतर जणगणना झाली नसल्याने अंदाजित लोकसंख्या ग्रहीत धरून सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी अध्यादेश काढला. त्यानुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ९२ करण्यात आली. तसेच बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार प्रत्येकी ३ नगरसेवकांचे ३० वॉर्ड आणि २ नगरसेवकांचा एक असे ३१ वॉर्ड करण्यात आले. यानुसार प्रभाग रचना निश्चित करून आरक्षण सोडत काढून मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला त्याचवेळी पाठविला आहे.

गेल्या चार वर्षापासून इच्छुक उमेदवार तयारीला लागले होते. तीनवेळा निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. तरूण मंडळे, तालीम-संस्थांच्या कार्यकर्त्यांना जपून ठेवण्यासाठी मोठा खर्च केला जात आहे. प्रत्येकवर्षी गणेशोत्सवापासून विविध सणसमारंभासाठी वर्गणी देताना इच्छुकांना नाकीनऊ येत आहे. एकदाची निवडणूक होऊन जाऊ… असा सूर इच्छुकांतून उमटू लागला आहे.

त्रिसदस्य की चार सदस्यीय?

ठाकरे सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे-फडवणवीस सरकारने ती संख्या पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे. बहुसदस्य प्रभाग रचना असली तरी आता त्रिसदस्य की चार सदस्य असा प्रश्न आहे. यापूर्वी त्रिसदस्य संख्येनुसार प्रभाग रचना झाली असली तरी आता चार सदस्यीय प्रभाग रचना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार नगरसेवकांचा एक प्रभाग होईल. कोल्हापूरलाही हा निर्णय लागू होईल. त्यामुळे महापालिकेला पुन्हा संपूर्ण प्रभाग रचना बदलावी लागणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button