NTSE : ‘प्रज्ञाशोध’ प्रश्नपत्रिकेतील ‘त्या’ अवघड प्रश्नाला हरकत !

NTSE : ‘प्रज्ञाशोध’ प्रश्नपत्रिकेतील ‘त्या’ अवघड प्रश्नाला हरकत !
Published on
Updated on

सरुड : चंद्रकांत मुदूगडे : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मार्फत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तर प्रज्ञाशोध निवड चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे प्रतिक्षित निकालाची संदिग्धता आणि उत्सुकताही वाढली आहे. विशेषतः इयत्ता चौथीच्या निवड चाचणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे काही पालक तसेच मार्गदर्शक शिक्षकांकडून प्रश्नपत्रिकेतील ३७ आणि ८४ या क्रमांकाच्या दोन प्रश्नांना नाहक आक्षेप घेतला जात आहे. हे अवघड वर्गवारीतील प्रश्न सोडविता न आल्याने किंबहुना चुकीची उत्तरे लिहिली गेल्याचे लक्षात आल्यावर त्या प्रश्नांसाठीचे सरसकट गुण परीक्षार्थींना देण्याचा अट्टाहास संबंधित पालक आणि मार्गदर्शक गुरुजनांनी शिक्षण विभागाकडे लावून धरल्याची चर्चा सुरू आहे.(NTSE)

कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सुमारे २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध निवड चाचणी परीक्षा दिली आहे. वास्तविक पाहता प्रज्ञाशोध परीक्षेचा दर्जा आणि स्वरूपानुसार प्रश्नपत्रिकेत २० टक्के प्रश्न हे अवघड (डी कॅटॅगरी) वर्गवारीला अनुरूप परीक्षार्थींना सोडवायला दिलेले असतात. त्यामुळे हे स्वरूप समजून घेत गत (३१ मार्चच्या) परीक्षेला सामोरे गेलेल्या मोजक्याच परीक्षार्थींनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक ३७ आणि ८४ यांची अचूक उत्तरे लिहिली आहेत. तर वरील प्रश्नांचे 'कठीण' स्वरूपच अवगत नसलेल्या सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांनी चुकीचे पर्याय (उत्तर) निवडले. यामुळे प्रत्येकी दोन गुण गमावल्याचा परिणाम म्हणून काटावरील गुण फरकाने काही विद्यार्थी निवड चाचणी गुणवत्ता यादीत येण्यास 'खो' बसल्याच्या जाणिवेने संबंधित मार्गदर्शक शिक्षकांना अस्वस्थ वाटू लागले आहे.

यातून संबंधित शिक्षक आणि पालकांनी एकत्र येत (बरोबर असलेला प्रश्न बाद ठरवून) सरसकट गुण बहाल करण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढवला आहे. साहजिकच दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष चुकीच्या उत्तराला गुणांचे बक्षीस दिल्यास प्रयत्नपूर्वक, समर्पक उत्तर देणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे अन्यायच होणार आहे. अशावेळी हा अनाठायी दबाव पुढे जाऊन परीक्षा मार्गातील 'प्रघात' बनून जाऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रज्ञाशोध निवड चाचणी परीक्षेचा निकाल वास्तवाला धरूनच जाहीर करण्याची आग्रही मागणी सुज्ञ पालक आणि शिक्षकांमधून होताना दिसते.

NTSE : हरकतीचा हाच तो ३७ वा प्रश्न आणि त्याचे उत्तर 

२५० किमी अंतर पूर्ण करण्यासाठी सकाळी सव्वा सहाला सुरू झालेला प्रवास प्रतितास ६० किमी प्रवास करून ३ तासानंतर विश्रांतीसाठी थांबला. ४५ मिनिटे विश्रांती घेऊन सुरू केलेला उरलेला प्रवास ताशी किती किमी वेगाने केल्यावर दोन तासात पूर्ण होईल ?

योग्य उत्तर (पर्याय) 
'३५ हजार मीटर प्रतितास'

परीक्षेच्या पारदर्शकतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह !

दरम्यान शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध (सामान्य ज्ञान) या परीक्षांच्या बाबतीत तांत्रिक उणिवांवरून नेहमीच गदारोळ झालेला लपून राहिलेला नाही. यावर्षीची प्रज्ञाशोध प्रश्नपत्रिकाही सदोष असल्याचे स्पष्ट झाले होते. छपाईबरोबरच काही तांत्रिक चुका आढळून आल्या. प्रशासनाने त्या तात्काळ ग्राह्य धरून त्याबदल्यात विद्यार्थ्यांना सरसकट गुण बहाल करण्याचा निर्णय घोषित केल्यामुळे आधीच अन्याय निवारण केल्याचे दिसून येते. तरीही वादविवाद तसेच कॉपी सारखे प्रकार टाळण्यासाठी प्रश्नांचे स्वरूप न बदलता आलटूनपालटून 'एबीसीडी' रचनेत प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्यास अधिक पारदर्शकता प्राप्त होईल. शिवाय चाळणी आणि निवड चाचणी या दोन परीक्षांऐवजी अशा एकाच परीक्षेद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांची पात्रता निश्चित करणे सहज शक्य होईल, असा मतप्रवाहही या मार्गदर्शक शिक्षकांमध्ये रुजताना दिसत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news