कोल्हापूर : मिणचे खुर्द येथे कालवा फुटून शेतीचे नुकसान (व्हिडिओ) | पुढारी

कोल्हापूर : मिणचे खुर्द येथे कालवा फुटून शेतीचे नुकसान (व्हिडिओ)

मिणचे खुर्द; पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील दुधगंगा नदीचा उजवा कालवा फुटला. कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. पाटबंधारे खात्याने या कालव्याच्या अस्तरीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून शेतीसह पिकांची झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दुधगंगा उजवा कालवा शाखा कूर ते मिणचे खुर्दपर्यंतचे दुरुस्तीचे व सफाईचे काम करण्यात आले. हे काम निकृष्ट दर्जाचे व नियमाप्रमाणे होत नाही अशा अनेक तक्रारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या. पण पाटबंधारे विभागाने या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता देत काम पूर्ण केले. परिणामी, ठिकठिकाणी कालवा फूटू लागला. शुक्रवारी मध्यरात्री मिणचे खुर्द येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील कालवा फुटून कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. तर शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त होवून पिकासह शेतीचे नुकसान झाले.

या कालव्याचे काठ ढासळणे, कालवा फुटणे हे प्रत्येक वर्षी सुरूच असते. पावसाळ्यात तर कालव्याचे काठ ढासळून कालव्याचे नुकसान होते. गेली कित्येक वर्ष हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो. दरवर्षी या कालाव्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होतो, पण, मजबूती करणासह अस्तरीकरणाचा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

कूर शाखेच्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत शासनाने प्रवाही पाण्याच्या वेगाचे कारण पुढे करत व प्रकल्प अहवालामध्ये या कालव्याच्या अस्तरीकरणाचा समावेश नसल्याने व नियामक मंडळाची परवानगी नसल्याने या कालव्याच्या अस्तरीकरणासह मजबूतीकरणाचा प्रश्न अनुत्तरीत राहिल्याचे सांगितले जाते. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेवून आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाटबंधारे विभागाला या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी सर्वे, अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येते.

आता पाटबंधारे खात्याने या कालव्याच्या अस्तरीकरण, मजबूतीकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. कालवा फुटीची पाहणी पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता माने, उपअभियंता चव्हाण, उपअभियंता अजिंक्य पाटील, शाखा अभियंता तनुजा देसाई यांनी केली व ताबडतोब उपाययोजना करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.

गेली अनेक वर्षे कालवा फुटून शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांचे नुकसान होते. पाटबंधारे खात्याने या कालव्याच्या मजबूतीकरणासह अस्तरीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षी होणारे नुकसान थांबवावे.
– टी. के. देसाई , शेतकरी, मिणचे खुर्द

हेही वाचा : 

Back to top button