१४ ‘मे’ला पुण्यात होणार ‘वज्रमूठ सभा’ ; संभाजीनगर सभेतल्या ‘या’ चुका टाळण्याचा निर्णय | पुढारी

१४ 'मे'ला पुण्यात होणार 'वज्रमूठ सभा' ; संभाजीनगर सभेतल्या 'या' चुका टाळण्याचा निर्णय

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमधील सभेला मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर महविकास आघाडीची पुढील सभा नागपूरमध्ये होणार आहे.

१४ मे रोजी पुण्यात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठीची आढावा बैठक आज पार पडत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरुन विविध चर्चा सुरु झाल्यानंतर आता पुण्यातील सभेत स्टेजवर एकाच प्रकारच्या खुर्च्या ठेवाव्या, अशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठकीत मागणी केली आहे. तसेच तसेच स्टेजवरील बॅकग्राउंडवर तिन्ही पक्षाचे चिन्ह लावण्यात यावेत. सभेच्या ठिकाणी कोणत्याही नेत्यांचे फोटो लावण्यात येऊ नयेत, अशी देखील मागणी या पक्षांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकारची खुर्ची देण्यात आली होती. वज्रमूठ सभेत असा कोणताही भेदभाव झालेली नाही, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र पुण्यातील सभेत ही चूक टाळली जावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं समोर येत आहे.

Back to top button