

पुढारी ऑनलाईन डेस्क : ( Dehydration Symptoms ) उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहाराबरोबरच पाणी पिण्यावरही तुमचं आरोग्य अवलंबून असतं. कारण या दिवसांमध्ये नियमित पाणी प्यायल्यास आपल्या शरीरातील जवळपास सर्व समस्या निम्म्या होऊ शकतात. मात्र पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केले तर उन्हाळ्यात शरीरामधील पाण्याची कमतरतेचा ( डिहायड्रेशन ) त्रास होवू शकतो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक वेळा काही लोकांचा मृत्यूही होतो. मात्र डिहायड्रेशनचा त्रास कसा ओळखायचा यासाठी शरीर काही लक्षणे दाखवते. जाणून घेवूया या विषयी…
तुम्हाला तहान लागली की समजावे की तुमच्या शरीरला पाणी पिण्याची गरज आहे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला डिहायड्रेशन त्रास होवू शकतो. त्यामुळे जेव्हा तहान लागेल तेव्हा शरीराच्या या संकेताकडे दुर्लक्ष करु नका.
तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी कमी पिल्यास तात्काळ याचे शरीरावर परिणाम दिसू लागतात. कमी पाणी पिल्याने तुमची लघवी गडद पिवळा किंवा एम्बर रंगाचा होते. असा त्रास सुरु झाला तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे, हे लक्षात घ्यावे.
उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्मा वाढल्याने साहजिकच लवकर थकवा जाणवतो. मात्र पुरेशी विश्रांती घेवूनही तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटत असेल, तर हे लक्षण तुम्हाला जास्त पाण्याची गरज असल्याचे दर्शवते.
उन्हाळ्यात शरीरामधील पाण्याची कमतरता असेल तर डोकेदुखी आणि मायग्रेन होऊ शकतात. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर हा डिहायड्रेशन त्रास आहे का हे तपासावे. पुरसे पाणी पिल्यानंतर डोकेदुखी थांबत असेल तर ही डोकेदुखी डिहायड्रेशनमुळे होती हे स्पष्ट होते.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही चक्कर येते. जर तुम्हालाही अचानक चक्कर येत असेल तर हे लक्षण असू शकते की तुम्हाला जास्त पाण्याची गरज आहे आणि तुम्ही तत्काळ पुरसे पाणी प्यावे.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तोंडाला कोरड पडते. तुमचया तोंडात चिकटपणा जाणवू शकतो. असे वाटल्यावर एक ग्लास पाणी प्या आणि तत्काळ फरक जाणून घ्या.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर मॉइश्चरायझर वापरण्यासोबतच शरीराला भरपूर पाणी पिणे अनिवार्य ठरते.
डिहायड्रेशनमुळे बद्धकोष्ठता आणि पाचन समस्या उद्भवू शकतात. तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर भरपूर पाणी प्या तुम्हाला तत्काळ फरक जाणवेल, असा सल्ला डॉक्टर देतात.