

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील अकिवाट गायरान जमिनीतील शेतीची अतिक्रमणे हटविण्याची बुधवारी (दि.२९) दुसऱ्या दिवशी मोहीम सुरू होती. मोहिमेला शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी विरोध करत अतिक्रमण मोहीम बंद पाडली होती. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शासनाकडून आलेल्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत. शेती व्यतिरिक्त रहिवाशी व व्यावसायिक अतिक्रमणाला हात लावला जाणार नाही, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ व शेतकरी शांत झाले. पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली.
अकिवाट गट क्रमांक 926 या गायरान जमिनीतील आज दुसऱ्या दिवशी लालू आवटी यांच्या मळ्यातून मोहिमेला सुरुवात झाली. अचीवाटची माझी सरपंच विशाल चौगुले स्वाभिमानीचे विश्वास बालीघाटे आंदोलन अंकुशचे दीपक पाटील यांनी सदरची मोहीम बंद पाडून या जमिनीवर औद्योगिक वसाहत उभी करण्याचा शासनाचा घाट आम्ही कधापही यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत ठिय्या मारला होता. स.पो.नि भांगे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न सुरू केला. असता १५ एप्रिल पर्यंत अतिक्रमणे हटवू नये याबाबत वरिष्ठ कार्यालयातून आम्ही न्याय मागणार आहे.
अकिवाट गायरान जमिनीतील शेवटच्या टप्प्याची गायरान जमिनी ताब्यात घेण्यासाठी महसुल प्रशासन,नगर भूमापन आणि पंचायत समितीचे पथकाने लालू आवटी यांच्या शेतालगत पासून बुधवार सकाळी ११ वाजता अतिक्रमण मोहिमेला सुरवात केली असता माजी सरपंच विशाल चौगुले, स्वाभिमानीचे विश्वास बालीघाटे, आंदोलन अंकुश चे दीपक पाटील यांनी सदरची मोहीम बंद पाडत दुष्काळा दरम्यान या परिसरातील शेतकऱ्यांना अधिक धान्य पिकवून धान्य संपत्ती निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या होत्या.शासनाने या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना द्याव्यात अशी मागणी केली.
तहसीलदार डॉ.मोरे-धुमाळ यांनी शासनाने शेतीची अतिक्रमणे हटविण्यात संदर्भात आदेश दिले आहेत रहिवाशी घरांचे व व्यावसायिक दुकानांचे अतिक्रमण हटवले जाणार नाहीत त्याबाबत शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत शेतीच्या जागेवरती शासनाचे कोणते प्रयोजन आहे याबाबत आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आम्हाला आलेल्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत. काही शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आहे काही शेतकरी सहकार्य करत आहेत. ग्रामस्थांनी या मोहिमेला विरोध करू नका अशी विनंती केली असता शेतकरी व ग्रामस्थांनी आपला पवित्रा बदलल्यानंतर मोहिमेला सुरुवात झाली.