कुडित्रे, प्रा. एम. टी. शेलार : 2013 च्या तुलनेत गेल्या दहा वर्षांत सरळ खताच्या किमती 198 टक्क्यांनी वाढल्या तर उसाची एफआरपी केवळ 116 टक्क्यांनी वाढली. शेतकरी उसालाच नव्हे तर शेतीलाच सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत. खताच्या वाढलेल्या किमतीबरोबर खत उत्पादक कंपन्यांचे युरियाचे लिंकिंग सुमारे 56.39 टक्के आहे. लिकिंगमधून शेतकर्यांची राजरोस पिळवणूक केली जात आहे. सरकारने खताच्या किमती नियंत्रित ठेवण्याची गरज आहे.
2012 च्या किमती पायाभूत म्हणून मिश्र खताच्या दरात 15 टक्के वाढ करुन दर निश्चित करण्याचा संघटक संघटनात्मक निर्णय 2013 मध्ये घेण्यात आला. त्यानुसार 50 किलो बॅगेच्या डी.ए.पी.ची 1260 रुपये, पोटॅॅशची 590 रुपये व फॉस्फेटची 300 रुपये किंमत पायाभूत म्हणून डी.ए.पी.ची किंमत 1260 रु. पोटॅशची किंमत 882 रु. फॉस्फेटची किंमत 410 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या बाजारात पोटॅॅशची (60 टक्के) किंमत 1700 रुपये, पीडीएफ – पोटॅश 14.5 टक्के 800 रुपये, डी.ए.पी. 1350 रुपये , इफ्को 10:26:26 1470 रु., ग्रोमर- गोशक्ती 1500 रुपये, आय.पी.एल. 16:16:16 : 1470 रुपये आहे. 2013 च्या तुलनेत डी.ए.पी.मध्ये 107 टक्के तर पोटॅशमध्ये 192 टक्के वाढ झालेली आहे. तर 2013 ला 2500 रुपये असलेली उसाची एफआरपी 2023 मध्ये 2900 रुपये झाली आहे. याचा अर्थ ही वाढ केवळ 116 टक्के आहे.
युरियाचे लिंकिंग जोरात…
लिंकिंग फक्त युरियालाच आहे असे नाही तर सरळ खतांनाही विद्राव्य खताचे लिंकिंग आहे. 266 रुपयाचे युरियाचे पोते पाहिजे असेल तर 1500 रुपयांची खते गळ्यात मारली जातात. साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यात लागणी व खोडवे तुटून गेलेले असते. त्याचप्रमाणे सुरू आणि आडसाली लागणी भरणीला आलेल्या असतात. शेतकर्यांची याचवेळी युरियांची मागणी वाढलेली असते. या काळातच प्रचंड लिंकिंग चालते. दुकानदारांना लिंकिंग खपवल्याशिवाय युरियाच मिळत नाही. साधारणतः 12 टन युरिया (240 बॅग्ज) घेतला तर मायक्रोला टॉनिकच्या सहा पेट्या (120 लिटर्स) घ्याव्या लागतात. 12 टन युरियाची किंमत होते 63 हजार 840 रुपये, तर मायक्रोला टॉनिकची किंमत होते 36000 रुपये. लिंकिंगची ही टक्केवारी 56.39 टक्के आहे.