कोल्हापूर जिल्हा बँक : ‘बिनविरोध’चे घोडे ‘या’ आठ जागांवर अडणार! | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : ‘बिनविरोध’चे घोडे ‘या’ आठ जागांवर अडणार!

कोल्हापूर : संतोष पाटील

कोल्हापूर जिल्हा बँक संचालक मंडळातील विकास सेवा गटातील चार जागा, पतसंस्था, महिला, ओबीसी, मार्केटिंग प्रोसेसिंग गटातील प्रत्येकी एक अशा आठ जागांवर जिल्हा बँक बिनविरोधाचे घोडे अडण्याची शक्यता आहे. नव्या संचालक मंडळात तीन किंवा चारच नवे चेहरे असतील, असे सध्याचे राजकीय बलाबल सांगते.

सेवा संस्था गटात कागल तालुक्यातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, करवीर तालुक्यात आ. पी. एन. पाटील आणि पन्हाळ्यातून आ. विनय कोरे यांची संचालकपदाची वाट तुलनेत सोपी आहे. शिरोळ तालुक्यात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधली असून, काँग्रेसचे गणपतराव पाटील हे ‘अभी नहीं तो कभी नहीं’ म्हणत रिंगणात उतरल्याने रंगत वाढली आहे. गगनबावडा तालुक्यात पालकमंत्री सतेज पाटील यांनी 68 पैकी 42 ठरावधारकांचा पाठिंबा मिळवत पी. जी. शिंदे यांच्यापुढे अडचणी वाढवल्या आहेत. हातकणंगले तालुक्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधातील उमेदवार अद्याप पुढे आलेला नाही.

चंदगड तालुक्यातून आ. राजेश पाटील गडहिंग्लज आणि आजर्‍यातून संतोष पाटील, अशोक चराटी यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. रणजितसिंह पाटील यांच्या जागी त्यांचे वडील माजी आ. के. पी. पाटील पुन्हा बँकेत येतील. बिनविरोध संचालक झालेले ए. वाय. पाटील यांनी राधानगरीतून उमेदवारीवर हक्क सांगितला आहे.

शाहूवाडी तालुक्यात सर्जेराव पाटील आणि मानसिंग गायकवाड यांच्यात रंगतदार लढतीत दोन मतांनी विजयाचे पारडे फिरले होते. शाहूवाडीत आ. विनय कोरे यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. तालुक्यातून माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर गटही निवडणुकीत सक्रिय असेल.

महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. देवयानी साळुंखे यांनी पुन्हा उमेदवारीची मागणी केली आहे. अनुसूचित जाती, जमाती गटातून आमदार राजू आवळे यांच्यासाठी काँग्रेस पुन्हा आग्रही असेल. मार्केटिंग प्रोसेसिंग गटातील खा. संजय मंडलिक यांचे नाव निश्चित आहे. याच गटातील बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या नावाला आ. कोरे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. संचालक अप्पी पाटील यांनी राखीव संस्था गटातून उमेदवारीची तयारी केली आहे. इतर संस्था प्रतिनिधी गटातून संचालक भैया माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. आ. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने ओबीसी गटातून विलासराव गाताडे यांच्या जागेवर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नागरी बँका आणि पतसंस्था गटातून अनिल पाटील यांनी प्रा. जयंत पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी अनिल पाटील यांचा कल सत्ताधारी आघाडीकडून लढण्याचा आहे.

विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

सेवा संस्था गटात तालुक्यातील नेत्यांचा दबदबा कायम राहणार आहे. मागील वेळी जागावाटपात राखीव नऊ प्रत्येकी चार-चार दोन्ही काँग्रेस आणि एक शिवसेना अशी विभागणी होती. आता शिवसेनेची संस्था गटात दोन आणि इतर गटात दोन जागांची मागणी आहे. आ. प्रकाश आबिटकर आणि चंद्रदीप नरके हे एका जागेवर ठाम आहेत. जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे संस्था गटासह इतर गटातून दोन जागांसाठी आग्रही आहेत. जो कोणी किमान एका जागेची संधी देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक हे जिल्हा बँकेत ताकदीने विरोधी पॅनेल करण्याची चाचपणी करत आहेत. आ. विनय कोरे यांच्या भूमिकेनंतरच विरोधी पॅनेलची दिशा आणि ताकद स्पष्ट होणार आहे.

Back to top button