शाहुवाडीच्या चिमुकलीचा ‘चंद्रा’ गाण्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल! ७५ लाखांहून अधिक लाईक (Video) | पुढारी

शाहुवाडीच्या चिमुकलीचा 'चंद्रा' गाण्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल! ७५ लाखांहून अधिक लाईक (Video)

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : हल्लीची मुलं जरा जास्तच टॅलेंडेट असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा टॅलेंडेट मुलांचे अनेक गमतीशीर व्हिडिओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले असतील. सोशल मीडिया तर अशा व्हिडिओंनी अक्षरश: भरलेलं आहे. या मुलांची कला आणि उत्साह पाहून खरंच थक्क व्हायला होतं. एक चिमुकली ‘चंद्रा…’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतेय. या मुलीच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. ही व्हिडिओ क्लिप तुम्ही सुद्धा एकदा पाहाच, हा डान्स पाहून तुमचे पाय सुद्धा आपोआप थिरकू लागतील.

शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील केंद्रीय प्राथमिक अनुस्कुरा शाळेत इयत्ता सातवीत शिकणारी व मोसम येथून शाळेला जाण्यासाठी सहा किलोमीटर पायपीट करणारी हर्षदा हरीश कांबळे हिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. हर्षदाला डान्सचे कोणतेही प्रशिक्षण नसताना फक्त यु ट्युबवरील व्हिडिओ पाहून तिने स्वतः डान्स बसविला आहे.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे. चंद्रा या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. आता शाळकरी मुलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

कार्यक्रम कोणताही असो त्यात ‘चंद्रा’ हे गाणं वाजल्याशिवाय आणि त्याच्यावर नाचल्याशिवाय तो पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. त्यामुळे ‘चंद्रा’ या गाण्याचे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण ठेका धरताना दिसत असतात.

अभिनेत्री अमृता खानविलकरकडून कौतुक

विद्या मंदिर कांटे शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक अनिल कांबळे यांनी महिलादिनी तिच्या गाण्याचा रील बनवून इन्स्टाग्राम, फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. आतापर्यंत इन्स्टाग्रामवर ५० लाख तर फेसबुकवर २५ लाख म्हणजे ७५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. एखादी अनुभवी नृत्यांगणा नाचावी तसे हावभाव करत ती डान्स करत आहे. या मुलीचा क्युट डान्स पाहून अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचे कौतुक केले आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

हे ही वाचा :

Hyundai Verna : ह्युंदाईच्या ‘या’ कारची ‘जबरदस्त’ चर्चा! व्हेरनाचे नवीन मॉडेल लॉन्च

पुणे : वेदर स्टेशन यंत्राद्वारे दर्जेदार डाळिंब उत्पादन

Back to top button