कोल्‍हापूर : आकुर्ळे येथे २० एकर आंबा फळबाग आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान | पुढारी

कोल्‍हापूर : आकुर्ळे येथे २० एकर आंबा फळबाग आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सरुड : पुढारी वृत्तसेवा आकुर्ळे (ता. शाहूवाडी) येथील सुमारे वीस एकर आंबा फळबाग अज्ञाताने लावलेल्या आगीत जळून खाक झाली. या घटनेत बी. आर. पाटील, सुदर्शन पाटील, दशरथ पाटील, राम गायकवाड, सावंत, कुडित्रेकर या सहा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेजारील शेतकरी व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे एल. आर. पाटील यांची फळबाग मात्र या भीषण अग्नितांडवातून वाचली.

संबंधित शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नांतून या माळरानावर फळबाग लागवड केली आहे. वन जमिनीच्या हद्दीलगत ही बाग असून, बागेच्या भोवती अग्नीरोधक चर (जाळ पाट) काढलेली असतानाही बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वन जमिनीतील झाडांना देखील आगीची मोठी झळ बसली आहे. मात्र वनविभागाने त्याकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही.

दरम्यान आकुर्ळे, माणगांव, कारंडेवाडी गावाच्या खाजगी मालकी हद्दीतील सुमारे दीडशे एकरहून अधिक गवती, शेतजमीन या अग्नितांडावामध्ये करपून गेली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करून नुकसान भरपाई त्वरित मिळावी. वास्तविक सातत्याने लागणाऱ्या आगीच्या घटनेत वनविभागाचे कोट्यावधींचे नुकसान होत असताना जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या समाजकंटक प्रवृतीला पायबंद घालण्याची कार्यवाही होताना दिसत नाही. निदान यापुढे तरी वनविभाग, तहसिल आणि पोलीस प्रशासनाने वणवा (अग्नी) प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवावी आणि शेतकरी वर्गाला दिलासा मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी नुकसानग्रस्त फळबाग शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा :   

Back to top button