Kolhapur : पन्हाळगडावर पाणी योजनेवर ५ कोटी खर्च होऊनही पाणी टंचाई कायम; योजनेची सखोल चौकशी करावी | पुढारी

Kolhapur : पन्हाळगडावर पाणी योजनेवर ५ कोटी खर्च होऊनही पाणी टंचाई कायम; योजनेची सखोल चौकशी करावी

पन्हाळा; पुढारी वृत्त सेवा : पन्हाळगडावर पाण्याच्या झळा सुरू झाल्या असून, गेल्या पंधरा दिवसात पाच दिवस पाणीपुरवठा झाला असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पन्हाळ्यात नगरपालिका पाणी पुरवठा योजना आहे. जीवन प्राधिकरण विभागाला पन्हाळा पाणी पुरवठा करणे अशक्य झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी ही योजना नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली. या पूर्वी नव्याने पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी व जॅकवेल बांधणीसाठी पाच कोटीचा निधी पण देण्यात आला आहे.  या निधीतुन उत्रे गाव येथे कासारी नदीच्या पात्रात नवीन जॅकवेल घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी थाटात या नव्या पाणी योजनेचे शुभारंभ झाला मात्र या वर्षात वारंवार गळतीमुळे व जॅकवेलच्या ठिकाणी नदीला पाणी नसल्याने पन्हाळ्यातील पाणी पुरवठा खंडित होत आहे. (Kolhapur)

Kolhapur : नागरिकांतून पाण्यासाठी नाराजीचा सुर कायम

 पन्हाळ्यात नागरिकांना एक दिवस आडणे पाणी दिले जाते. पन्हाळ्यात नळ कनेक्शन सहाशे आहेत. पाणी साठप सहा लाख लिटर असे असूनही पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांतून पाण्यासाठी नाराजीचा सुर कायम आहे. याबाबत पन्हाळा मुख्याधिकारी व प्रशासक चेतनकुमार माळी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पन्हाळा पाणी पुरवठा योजना झाली आहे. मात्र नदिमध्ये पाणी नसल्याने पाणी देता येत नाही, या बाबतीत पाटबंधारे विभागाचे बरोबर बोलणे झाले आहे. पन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर मागवले असून लोकांना टँकरने पाणी  देणार आहोत. पण पाच कोटींची पाणी योजना करून देखील पन्हाळ्यात टँकरने पाणी देणे म्हणजे खेदजनक असल्याचे नागरिक रमेश स्वामी यांनी मत व्यक्त केले.

या बाबत लघु पाटबंधारे विभागाकडून  माहिती दिली आहे की शिंगणापूर बंधाऱ्याच्या काम सुरू आहे. त्यामुळे राधानगरी- काळमवाडीचे बॅक वाटर व कासारी बंधाऱ्याच्या पाण्याच्या पातळीत कमतरता असल्याने नदीत पाणी असून पन्हाळ्याच्या जॅकवेलच्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी असल्याने पाणी जॅकवेल मध्ये येत नाही व त्यामुळे पाणी पुरवठा होत नाही.

योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी

कासारी नदीत पाणी आहे पण जॅकवेलला पाणी मिळत नाही. जर पन्हाळा नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असेल तर जॅकवेल पाणी असणाऱ्या जागी बांधण्यात यावे अशी मागणी होत आहे. पाच कोटी रुपये खर्च करून जर पन्हाळा नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसेल तर या पाणी योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरेचे पन्हाळा प्रमुख मारुती माने यांनी केली आहे. पन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून पन्हाळा पालिकेच्या प्रशासकाना विचारणा करावी लागते. पण पाणी पुरवठा विभागाकडे ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचे कोणतेही उत्तरदायित्व नाही अशी अवस्था पालिकेत आहे. या विभागाकडे सर्व कर्मचारी एका खाजगी कंपनीकडून नेमले आहेत असे सुत्रांकडून समजते. त्यांच्याशी संपर्क केला असता  माहिती दिली जात नाही. असा नाराजीचा सुर नागरिकांमध्ये आहे.

Kolhapur : पाणी पुरवठा दररोज व सुरळीत व्हावा

गेल्या आठवड्यात उत्रे ते रेडे घाटी या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाईपमध्ये गळती सुरू झाली होती त्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही. गळती काढण्याचे व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा होणार नसल्याचे सूचना फलक लावण्यात आले होते. मात्र पाणी पुरवठा झाला नसल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. कधी गळती, कधी उपसा वेळेत केला नाही, तर कधी जेकवेल ला पाणी मिळाले नाही, नदीत पाणी नाही अशा कारणांनी पन्हाळकरांना पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पन्हाळ्यात पाणी पुरवठा दररोज व सुरळीत व्हावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

Back to top button