मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा, कार्यकर्ते आक्रमक; अधिकारी म्हणाले... | पुढारी

मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा, कार्यकर्ते आक्रमक; अधिकारी म्हणाले...

कागल; पुढारी वृत्तसेवा : आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्यानंतर कागल तालुक्यातील मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचा आणि ईडीच्या कारवाईचा निषेध करीत प्रचंड घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, निवासस्थानासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी शांत राहावे, आम्ही जबाब नोंदवून झाल्यानंतर जाणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याची माहिती मिळत आहे.

आमदार मुश्रीफ निवासस्थानी नाहीत, गोकुळ दूध संघाचे संचालक नावीद मुश्रीफ आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू निवासस्थानी आहेत. घरातील कामगारांचे देखील अधिकाऱ्यांकडून जबाब नोंदवले जात आहेत. “घरामध्ये लहान मुले व मोठा मुलगा आजारी असताना ईडीचे अधिकारी चौकशी कसली करत आहेत. चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांना बोलवा, ईडीचे अधिकारी महिलांची चौकशी करून त्यांना त्रास देत आहेत,” असे आमदार हसन मुश्रीफ यांच्या पत्नी यांनी माध्यमांना सांगितले.

मुश्रीफ यांच्या घरी नियमित येणारे दूधदेखील गार्डने रोखल्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले. भारतीय जनता पक्षाचा तसेच ईडी अधिकाऱ्यांचा निषेध करत घोषणाबाजी सुरू आहे.

या छाप्यात आमदार हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू अनवर मुश्रीफ यांच्या घरी देखील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तसेच जुन्या घरात देखील अधिकारी गेले होते. किरीट सोमय्या यांनी काल ट्विट करून मुश्रीफ यांच्या घरी छापा पडल्याचे सांगितले होते. मात्र आज छापा पडला ठरवून छापा टाकत आहेत का? असा सवाल कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button