कसब्याच्या निकालावर भाजप नेत्यांची सबुरी; पुण्यातील पदाधिकार्‍यांबरोबर मुंबईत बैठक | पुढारी

कसब्याच्या निकालावर भाजप नेत्यांची सबुरी; पुण्यातील पदाधिकार्‍यांबरोबर मुंबईत बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवावर भाजप नेत्यांनी सध्या सबुरीचा पवित्रा घेतला आहे. कारवाईचा बडगा न उगारता पदाधिकार्‍यांनी खचून न जाता झालेल्या चुका सुधारून पुन्हा कामाला लागावे, अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. मुंबई भाजप पक्ष कार्यालयात बुधवारी रात्री कसबा पेठ विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन बैठक झाली.

बावनकुळे व पाटील यांच्यासह या बैठकीला उमेदवार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे हे उपस्थित होते. या बैठकीत बावनकुळे आणि पाटील यांनी निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतली.

मतदार विभागल्याची कारणमीमांसा
प्रामुख्याने भाजपची हक्काची व्होट बँक असलेल्या प्रभाग क्र.15 आणि 29 मध्ये मते कमी का मिळाली़, अशी विचारणा बावनकुळे यांनी केल्याचे समजते. त्यावर पुण्यातील पदाधिकार्‍यांनी खुलासा करताना या निवडणुकीत प्रामुख्याने या दोन प्रभागात 5 टक्के इतके कमी मतदान झाले. त्याचा फटका काही प्रमाणात बसला. तसेच कसबा मतदारसंघातून जे 14 हजार मतदान वगळण्यात आले आहे.

त्यामधील जवळपास चार ते पाच हजार मते याच प्रभागातील होती. हे मतदार वेगवेगळ्या मतदारसंघात गेले असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचता आले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच मागील प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षांच्या मतांची बेरीज 90 हजारांपेक्षा अधिक होती. या निवडणुकीत मात्र, सर्व एकत्र येऊनही 72 हजार मते मिळाली. तर भाजपची मते मात्र वाढली असल्याचे तसेच पूर्व भागातही भाजपला चांगली मते मिळाली असल्याचे पुण्यातील पदाधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले.

पुन्हा जिंकण्याचा निर्धार
कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला होता, तो पुन्हा जिंकायचा आहे, या निर्धाराने आता झालेल्या चुका सुधारून एकदिलाने पुन्हा कामाला लागा, असे आदेश दिले असल्याचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.

पदाधिकार्‍यांचा सुटकेचा नि:श्वास
कसबा निवडणुकीत पराभवानंतर पक्षनेतृत्वाकडून मोठी झाडाझडती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मुंबईतील बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सबुरीचा पवित्रा घेत पदाधिकार्‍यांना केवळ चुका सुधारण्याचे सांगत माफीनामा दिला. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

Back to top button