

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र पुन्हा कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित विभागाने दूधगंगा नदी पात्रात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी दत्तवाड येथील नागरिकांमधून होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात निम्म्याहून अधिक दिवस दूधगंगा नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात चांगलीच भटकंती करावी लागली होती. तसेच शेतातील उभी पिके विशेषता भाजीपाल्यावर तसेच नुकत्याच लावणी केलेल्या उसावर याचा विपरीत परिणाम झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी अखेरीस नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. नदीपात्रात पाणी येऊन दहा ते बारा दिवस झाले तोवर पुन्हा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांची पुन्हा पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
नागरिकांना विहिरी, कूपनलिका, बोर आदींवर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. दूधगंगा नदीवरील दत्तवाड हे शेवटचे गाव असल्याने दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडल्यानंतर ते पाणी ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यावर ज्या -त्या गावातून अडवले जाते. तेथे पाणी ओवर फ्लो होऊन त्यानंतर पाणी पुढील गावात येते. परत तेथेही ते अडवले जाते हीच पद्धत सर्वत्र अवलंबली जात आहे. त्यामुळे फार कमी प्रमाणात पाणी दतवाडपर्यंत पोहोचते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असल्याने ठीक- ठिकाणी पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने पाण्याची गरज ओळखून थोडे अधिक प्रमाणात व टप्प्याटप्प्याने पाणी सोडत राहणे गरजेचे आहे.
दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दत्तवाड – मलिकवाड व दत्तवाड – एकसंबा या बंधाऱ्यावर पाणी अडवण्यासाठी बर्गे घालणे गरजेचे आहे. पाटबंधारे खात्याने याचीही दखल घ्यावी. जेणेकरून थोडा अधिक कालावधी नदीपत्रात पाणी राहील.