कोल्हापूर : कुरुंदवाड येथे लव्ह जिहादविरोधात हिंदू गर्जना मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाड येथे लव्ह जिहादविरोधात हिंदू गर्जना मोर्चा

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा: कुरुंदवाड येथे लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी, गोहत्या याविरोधात शिरोळ तालुक्यातील समस्त हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आज (दि.२६) हिंदू-गर्जना मोर्चा काढण्यात आला. हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावत सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांना निवेदन देण्यात आले.

कुरुंदवाड येथील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज दुपारी साडेतीन वाजता मोर्चाला सुरवात झाली. शहरातील दर्गा चौक, पालिका चौक, थिएटर चौक ते नवबाग मार्गावरून हिंदू-गर्जना मोर्चा काढण्यात आला. जुने बस स्थानक चौकातील कन्या विद्या शाळेच्या मैदानावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. हिंदुत्ववादी प्रवक्ते विक्रम पावसकर, शिवप्रतिष्ठान-हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिवजी व्यास, मुकेश दायमा आदी उपस्थित होते.

यावेळी सभेत बोलताना विक्रम पावसकर म्हणाले की, देशात हिंदू माता-मुलींना लक्ष बनवून त्यांच्यावर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहादची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. लव्ह जिहाद विरोधात सुरू असलेला हा संघर्ष केवळ आपला संघर्ष नसून संपूर्ण हिंदुस्थान व हिंदूंचा संघर्ष आहे. धर्माच्या रक्षणासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे.

शिवप्रतिष्ठान-हिंदुस्थानचे अध्यक्ष देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आज हिंदू माता-भगिनींच्या संरक्षणासाठी मोर्चे काढावे लागतात. ही शोकांतिका आहे. आपल्या माता-भगिनींच्या स्वभावात राजमाता जिजाऊंचे विचार बिंबवल्यास लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा चुकीचा विचार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी भगव्या टोप्या, ध्वज घेऊन जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, भारत माता की जय अशा जोरदार घोषणांनी शहर दणाणून केले. मोर्चासाठी दंगल नियंत्रण पथकासह दीडशेहून अधिक पोलीस व गृहरक्षक दलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा 

Back to top button