MJPJAY : पंचनामा – भाग २; जीवाच्या भीतीने रुग्णांच्या तक्रारी नाहीत | पुढारी

MJPJAY : पंचनामा - भाग २; जीवाच्या भीतीने रुग्णांच्या तक्रारी नाहीत

कोल्हापूर : डॅनियल काळे :  महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेवर राज्य शासन दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे. गोरगरिबांना उपचाराचा खर्च नको आणि उपचारांअभावी त्यांचा जीवही जायला नको म्हणून शासन हजारो कोटींचा खर्च करत आहे; पण नेमक्या शासनाच्या योजनेच्या मूळ हेतूलाच या व्यवसायातील काही अपप्रवृत्तीमुळे हरताळ फासला जात आहे. रुग्णांच्या जीवाची भीती घालून गैरमार्गाचा अवलंब करून नातेवाईकांचे खिसे आणि शासनाची तिजोरीही रिकामी करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायातील काही अपप्रवृत्तींना शासनानेच आता आळा घातला पाहिजे. ही योजना लोकांच्या भल्याचीच आहे. त्यामुळे योजनेतील दोष बाजूला करून शासनाने ही योजना अधिक सक्षमपणे राबविली, तर लोकांच्या खिशातील एक पैसाही खर्च न होता त्यांच्यावर उपचार होणार आहेत. (MJPJAY)

MJPJAY : पंचनामा – भाग २

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही २०१६ पासून राबविली जाते. त्यापूर्वी या योजनेचे नाव राजीव गांधी जनआरोग्य योजना असे होते. गोरगरिबांवर मोफत उपचार व्हावेत, असा या योजनेचा मूळ हेतू होता. त्यामुळे १,१०० आजारांचा समावेश योजनेत केला आहे. खासगी रुग्णालयांतही उपचारांची सोय केली आहे. त्यामुळे लोकांना अगदी सहजरीत्या या योजनेचा लाभ घेता येतो. रेशन कार्ड आणि आधार कार्ड असले की, योजनेतील समावेश निश्चित होता. सकाळी नोंदणी झाली की, सायंकाळी मोबाईलवर योजनेत समावेश झाल्याचा संदेश येतो. एकदा योजनेत समावेश झाला की, रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला घरात पोहोचविण्यासाठी रिक्षाचा खर्च देण्यापर्यंतच्या तरतुदी शासनाने केल्या आहेत. आरोग्यमित्रांकडून तशी विचारपूसही नातेवाईकांकडे आणि रुग्णांकडे केली जाते. परंतु, योजनेतच उशिरा समावेश केला जातो. तुम्ही योजनेसाठी पात्र नाही, असे सांगून टोलवाटोलवी केली जाते. नातेवाईकांना तांत्रिक बाबी माहीत नसतात, त्यामुळे बोलायची अडचण असते. त्यातच रुग्ण संबंधित हॉस्पिटलच्या ताब्यात असतो. त्यामुळे त्याच्या भीतीने रुग्णालयाविषयी तक्रार द्यायला कोणी पुढे येत नाही. तक्रार आली तर आरोग्य विभागाकडून कारवाई होते आणि संबंधित योजना त्या रुग्णालयातून काढून घेतली जाते.

योजनेत पात्र; तरीही दिशाभूल

या योजनेत १,१०० आजारांचा समावेश आहे. बहुतांशी आजारपणात रुग्ण व नातेवाईकांवर खर्चाचा भार पडू नये म्हणून सरकारने अभ्यास करून १,१०० आजार निश्चित केले आहेत. तसेच काही संलग्न आजारांच्या उपचारासाठीही तरतूद आहे. तरीदेखील तुमचा आजार यात बसत नाही. जन आरोग्य आता सरकारी निधी संपला, असे सांगून जादाचे पैसे आकारले जातात.

जिल्ह्यातील स्थिती

| २०१२ ते २०२३ या कालावधीत विविध आजारांवर उपचार झालेल्या रुग्णांची संख्या…

  • कॅन्सर शस्त्रक्रिया व उपचार : ९० हजार
  • हृदय शस्त्रक्रिया : ५६ हजार ३९४
  • डायलिसिस : ४१ हजार ५६३
  • इतर शस्त्रक्रिया व उपचार : १ लाख ५१ हजार ४५१

हेही वाचा 

Back to top button