

कोल्हापूर, अनिल देशमुख : कोल्हापुरातून सुटणार्या तीन एक्स्प्रेसचे जुने 'आयसीएफ' कोच (डबे) बदलून नव्या तंत्रज्ञानाचे 'एलएचबी' कोच लावण्यात येणार आहेत. एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने ही कार्यवाही केली जाणार आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसचा यामध्ये समावेश आहे.
कोल्हापुरातून सुटणार्या सर्व एक्स्प्रेसना सध्या 'आयसीएफ' कोच आहेत. दहा-पंधरा वर्षांचे हे जुने कोच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, दीक्षाभूमी आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसचे कोच बदलण्यात येणार आहेत. नव्या कोचमुळे रेल्वेच्या सुरक्षित प्रवासासह वेग वाढण्यासही मदत होणार आहे. तसेच आसन क्षमता वाढणार असल्याने वेटिंग लिस्ट कमी होणार आहे. नवे कोच लावल्यानंतर प्रत्येक गाडीमधील प्रवासी क्षमता सुमारे 80 ते 110 पर्यंत वाढणार आहे.
राज्यातील सर्वात लांब अंतर आणि सर्वात जास्त कालावधीचा प्रवास असणारी रेल्वे, अशी ओळख असणार्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. कोल्हापूर ते गोंदिया हा 26 तासांचा प्रवास नव्या कोचमुळे आणखी आरामदायी आणि कमी वेळेचा होणार आहे. आठवड्यातून एक दिवस धावणार्या कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेसचा प्रवास तब्बल 52 तासांचा आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये जाण्यासाठी थेट गाडी असल्याने या गाडीला गर्दी असते. कोल्हापूर-नागपूर या आठवड्यातून दोनदा धावणार्या गाडीचाही प्रवास 22 तासांचा आहे. त्यालाही प्रवाशांचा प्रतिसाद आहे. या नव्या कोचमुळे या गाड्यांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
एक्स्प्रेसचा लूक बदलणार
यापूर्वी 'एलएचबी' कोच राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस अशा रेल्वेगाड्यासाठी वापरले जात होते. आता अन्य एक्स्प्रेसलाही 'एलएचबी' कोच लावले जात आहेत. पारंपरिक निळ्या अथवा तपकिरी रंगाच्या डब्याऐवजी 'एलएचबी' कोच लाल रंगाचे आकर्षक असतात. यामुळे या एक्स्प्रेसचा लूकही बदलणार आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसला 'एलएचबी' कोचची मागणी
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसला 'एलएचबी' कोच लावावेत, अशी मागणी आहे. मात्र, ही गाडी गुंटकल विभागाकडे आहे. त्याचे रेक (डबे) दक्षिण रेल्वेचे आहेत. यामुळे या गाडीला 'एलएचबी' कोच लावण्याचा निर्णय झालेला नाही.