आगामी विधानसभा धनुष्यबाण चिन्हावरच लढणार, कोल्हापुरातून चंद्रदीप नरके यांची घोषणा | पुढारी

आगामी विधानसभा धनुष्यबाण चिन्हावरच लढणार, कोल्हापुरातून चंद्रदीप नरके यांची घोषणा

कोपार्डे : पुढारी वृत्तसेवा : मी शिवसेना सोडलेली नाही, धनुष्यबाणही सोडलेला नाही. मुळचाच शिवसेनाच आहे. आगामी २०२४ विधानसभेसाठी मी धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. कणेरी मठाकडून आयोजित महाआरती कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागतासाठी चंद्रदीप नरके कार्यकर्त्यासह आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. त्यामुळे नरकेंचा गट कोणता? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट झाल्याचे दिसून आले.

यावेळी ते म्हणाले की, मी शिवसेनेतच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला आलो आहे. या महाआरतीला करवीर मतदार संघातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजर आहेत. शिवसेना, धनुष्यबाण व एकनाथ शिंदे गट यात वेगळं काही नाही. अमित शहांच्या स्वागतालाही हजर होतो. शिवसेना भाजप महायुती आहे. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची महायुती आहे. सर्व शिवसैनिक एकत्र आलेले आहेत. कणेरी मठाचा चांगला कार्यक्रम होत आहे. पंचगंगेच्या काठावर महाआरती व मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सर्व शिवसैनिक उत्स्फुर्तपणे हजर आहेत. त्यामुळे भाजप शिवसेना युती कडून मी निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या पराभवानंतर पाचव्या दिवसापासून मी पुढच्या निवडणुकीची तयारी केलेली आहे. कारखाना निवडणुकीत आक्रमक होतो. मी संयमी असून ज्या ठिकाणी आक्रमकता दाखवायची असते त्या ठिकाणी मी दाखवतो. पुढच्या विधानसभेसाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे करवीर मतदार संघातील आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : 

Back to top button