नागपुरातील बाळ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, 20 बाळांची विक्री झाल्याचे उघड | पुढारी

नागपुरातील बाळ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, 20 बाळांची विक्री झाल्याचे उघड

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बाळ जन्माला आल्यानंतर काही दिवस त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून मग त्या मुलाचा सौदा करायचा या पद्धतीने उपराजधानी नागपुरातील बाळ तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सूत्रधार असलेल्या आयशा खान ऊर्फ श्वेताने आतापर्यंत जवळपास २० बाळांची तस्करी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

आयेशाची सहकारी असलेल्या रेखाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, गुन्हेशाखा पोलिस तिची कसून चौकशी करीत आहेत. सखोल चौकशीनंतर निश्चितच हा बाळ विक्रीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयशाने रेखा अप्पाजी पुजारी (वय ५४, रा. निर्मल कॉलनी) या महिलेच्या माध्यमातून आतापर्यंत १८ पेक्षा अधिक बाळांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालल्या माहितीनुसार, आयशा खान ही धंतोलीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना तिच्या जवळच्या दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये रेखा ही नर्स होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी या दोघींची ओळख झाली. दरम्यान, आयशा आणि नंतर रेखानेही काम सोडले. रेखा ही विश्वासू असल्याने आयशाने तिला आपल्या रॅकेटमध्ये सामील करून घेतले. विशेष म्हणजे, गरजू आर्थिक दुर्बल महिलांना शोधण्याचे काम तिने रेखावर सोपविले होते. रेखा ही गरजू महिलांचा शोध घेऊन त्यांना पैशांचे आमिष दाखवायची. डिलिव्हरीनंतर बाळाला खरेदी करायची.

याच दरम्यान कोराडी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला रेखाने पैशांचे आमिष दाखविले आणि एका नवजात बाळाला गुजरातमधील धनाढ्य दाम्पत्याला देण्याचे आश्वासन दिले. प्रसूतीदरम्यान रेखा तीन दिवस या महिलेसोबत होती. रेखानेच आयशाला हॉस्पिटलमध्ये बोलाविले आणि बाळाला तिच्या स्वाधीन केले. मात्र, आयशाने बाळ गुजरातमधील दाम्पत्याला न देता अन्य दाम्पत्याला परस्पर विकले.

याबाबतची माहिती महिलेला मिळताच तिने गुन्हेशाखा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी रेखा, डॉ. नीलेश रामबहादूर मौर्य (वय ३७), सचिन पाटील, आयशा खान ऊर्फ श्वेता सावले व मकबूल खानविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने रेखाला अटक केली.

हेही वाचा : 

Back to top button