पुणे : गोळीबार करुन ३ लाख ७८ हजार लुटले ; खेड शिवापूर येथील घटना | पुढारी

पुणे : गोळीबार करुन ३ लाख ७८ हजार लुटले ; खेड शिवापूर येथील घटना

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे – सातारा रस्त्यावरील सोनल वाईन्स या मद्य विक्रीच्या दुकानात दिवसभरात जमा झालेली रक्कम घेऊन जात असताना तीन चोरट्यांनी गोळीबार करुन ३ लाख ७८ हजार रुपयांची रक्क्म लुटुन नेली. रविवारी (दि. १९) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर हद्दीत असणारे सोनल वाईन्स हे दुकान बंद करून दीपक शंकर जगदाळे(रा. गराडे, ता. पुरंदर), कालेश्वर अगारीया हे दोघे जण राखाडी रंगाच्या पिशवीत ३ लाख ७८ हजार रुपये घेऊन शेजारीच असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीवरुन जात होते. त्याचवेळी मागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन पिशवी हिसकावण्याचा  प्रयत्न केला. मात्र, कालेश्र्वर याने विरोध करताच चोरट्यांनी पिस्तुलातून दोन वेळा गोळीबार करून हातातील बॅग हिसकावून पोबारा केला.

याबाबत राजगड पोलिस ठाण्यात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.

Back to top button