Mahashivratri 2023 Special Story : शिवरायांच्या गड-किल्ल्यांवरील शिव मंदिरे | पुढारी

Mahashivratri 2023 Special Story : शिवरायांच्या गड-किल्ल्यांवरील शिव मंदिरे

कोल्हापूर, सागर यादव : Mahashivratri 2023 Special Story :सह्याद्रीच्या बेलाग डोंगररांगांतील अभेद्य गडकोट-किल्ल्यांच्या साहाय्याने गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर करून शिवछत्रपतींनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण केले. ‘हर हर महादेव’ अशी युद्ध गर्जना करत शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने अनेक लढाया जिंकत या स्वराज्याचे रक्षण केले. यामुळे महादेव म्हणजेच शिवाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळेच शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या प्रत्येक गडकोट-किल्ल्यावर शिव मंदिरे पाहायला मिळतात. महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गवैभवावर असणार्‍या महादेव मंदिरांविषयी थोडे…

Mahashivratri 2023 Special Story : महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी उपवास सोडतात. या दिवशी बेलाची पाने, पांढरी फुले वाहून शिवाची पूजा केली जाते.

तर गड-किल्ल्यांवरील शिव मंदिरे

गगनगड, सामानगड, महिपालगड, कलानिधीगड, पारगड, गंधर्वगड या गडकोट-किल्ल्यांवर आणि परिसरात महादेव तथा शिव मंदिरे आहेत. काही मंदिरांना विशेष नावे आहेत, तर बहुतांशी मंदिरे केवळ महादेव मंदिर नावाने ओळखली जातात.

Mahashivratri 2023 Special Story :पन्हाळगड

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची दक्षिणेकडील राजधानी म्हणून पन्हाळगडाला महत्त्व होते. पर्णालदुर्ग असे पन्हाळगडाचे प्राचीन नाव. सोमेश्वर, हरिहरेश्वर, बालेकिल्ल्यातील महादेव मंदिरासह 5 ते 6 छोटेखानी शिव मंदिरे आहेत. शिवछत्रपतींनी या मंदिरांत दर्शन घेतल्याचे संदर्भ अनेक संदर्भग्रंथांत मिळतात.

पावनगड

पन्हाळगडाचा जोड किल्ला असणार्‍या पावनगडाच्या डोंगराला मार्कंडेय पर्वत असेही म्हटले जायचे. शिवछत्रपतींनी मार्कंडेय पर्वताला किल्ल्याचे स्वरूप दिले. पावनगडाकडे दुर्लक्षामुळे शिव मंदिरात अनेक वर्षे शिवलिंग नव्हते. अलीकडच्या काळात ते पुन्हा बसविण्यात आले आहे.

विशाळगड

शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या विशाळगडावर सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणार्‍या हजरत मलिक रेहानबाबांच्या दर्ग्याबरोबरच विविध हिंदू देवदेवतांची मंदिरे आहेत. भगवंतेश्वर, अमृतेश्वर अशा महादेव मंदिरांचा यात समावेश आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.

भुदरगड

गारगोटीपासून जवळ असणार्‍या भुदरगडावर भैरवनाथ, भवानीदेवी यासह दोन महादेवाचीही मंदिरे आहेत. याशिवाय जखुबाई गुहा मंदिर, पहारेकर्‍यांची शिळा खोली, दूधसाखर तलाव, कचेरी, तटबंदी-बुरूज अशा वास्तू आजही पाहायला मिळतात.

Mahashivratri 2023 Special Story : रांगणा किल्ला

प्रसिद्धगड ऊर्फ रांगणा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत जंगल परिसरात आहे. रांगणाई मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिरासह गडावर महादेव मंदिरही आहे. पूर्णपणे पडलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी निसर्गवेध परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे.

Mahashivratri 2023 : उज्जैन उजळणार २१ लाख दिव्यांनी; गिनीज बुकात होणार नोंद

Mahashivratri : महाशिवरात्री विशेष : ‘शिवपंचाक्षरी स्तोत्राचे महत्व’

Back to top button