कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ ते २०२७-२८ या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले, कारखान्याची प्रारूप मतदार यादी १३ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाली आहे. २२ फेब्रुवारी पर्यंत हरकतींची मुदत आहे. ६ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देतील. मे महिन्यात कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर काराखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री आ. सतेज पाटील आणि माजी आ. अमल महाडिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र सभासदांना आपली बाजू मांडण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांनी दोन महिन्याचा अवधी द्यावा यानंतर पुढील तीन महिन्यात पात्र अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा असा महत्त्वपूर्ण निर्णय निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने ४ जानेवारीला दिला. यापूर्वी अपात्र ठरलेले कारखान्याचे ते सभासद पात्र की, अपात्र याबाबतचा निर्णय होईल तेव्हा होईल, दरम्यान कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते अपात्र सभासद मतदानास पात्र ठरणार आहेत. या गोष्टींची जाणीव ठेवूनच सत्ताधारी आणि विरोधी गट आक्रमक होऊन आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
कारखान्याने १४३ 'ब' वर्ग (संस्था सभासद) सभासदांपैकी ९ फेब्रुवारीपर्यंत ठराव दाखल करण्याच्या अंतीम मुदतीनंतर १३२ ठराव दाखल झाले आहेत. याबरोबरच कारखान्याचे १६ हजार ८१५ ऊस उत्पादक सभासदांची यादी सादर केली आहे. दरम्यान, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क, ब व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ चे नियम ४(१) व ९ ते ११ नुसार श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि., कसबा बावडा ता. करवीर, जि. कोल्हापूर या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूकीसाठी प्रारूप मतदार यादी अंतिम करणेचा कार्यक्रम जाहिर केला आहे.
१५ मार्चपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधी आघाडीकडून यापूर्वी अपात्र ठरवण्यात आलेल्या १३४६ सभासदांना येत्या पंचवार्षिक निवडणूकीत मतदान करण्यास आक्षेप घेण्यात येण्याची शक्यता आहे.
कारखान्याचे एकुण ऊस उत्पादक सभासद : १६ हजार ८१५
'ब' वर्ग (संस्था सभासद) : १४३ (पैकी मुदतीत ठराव दाखल १३२)
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : १३ फेब्रुवारी
प्रारुप यादीतील नावांबाबत हरकत घेण्याची मुदत : २२ फेब्रुवारी
हरकतीवर सुनावणी : ४ मार्चपर्यंत
अंतिम यादी प्रसिध्दी : ९ मार्चपर्यंत
निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी : मार्च अखेर
मतदान : मे महिन्यात
हेही वाचा :