कोल्हापूर : पन्हाळ्यावर जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळ्यावर जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव

कोल्हापूर; सुनील सकटे : अतिवृष्टीसह अन्य कोणत्याही कारणाने पन्हाळ्याचा संपर्क तुटू नये यासाठी सध्याच्या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे 23 जुलै 2021 रोजी पन्हाळ्याला जाणारा रस्ता खचला होता व नऊ महिने 11 दिवस संपर्क तुटला होता. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची प्रचंड गैरसोय झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा रस्ता तयार केला जाणार आहे. मुख्य अभियंत्यांकडे असलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पन्हाळ्याचा संपर्क कधीही तुटणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

ऐतिहासिक पन्हाळगडावर लाखो पर्यटक येेतात. विद्यार्थ्यार्ंच्या सहलीचे हे आकर्षण आहे. गेल्या काही वर्षांत पन्हाळ्याच्या प्रवेशद्वारातच रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रस्ता बंद करण्याची वेळ आली. अडीच कि.मी. रस्त्यापैकी 500 मीटर रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जातो. त्यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याच्या अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांनी मुख्य अभियंत्यामार्फत पाठविलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयात आहे.

वर्षाला 30 ते 35 लाख पर्यटक

सोमवार ते शुक्रवार 700 ते 800 तर शनिवार आणि रविवार प्रत्येकी 2 हजार ते 2 हजार 500 पर्यत पर्यटक येतात. सुट्टीच्या काळात पन्हाळ्याला येणार्‍या पर्यटकांची संख्या 25 हजारावर जाते. दरवर्षी 30 ते 35 लाख पर्यटक पन्हाळ्यावर येतात.

खचलेल्या रस्त्यासाठी जीओग्रीड-जीओटेक्स्टाईल तंत्रज्ञान

वारंवार खचणार्‍या रस्त्यावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी तज्ज्ञांच्या सूचनेनुसार खचलेला रस्ता 25 मीटर उंच, 50 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद बनविण्यात आला आहे. रस्त्यासाठी जीओग्रीड आणि जीओटेक्स्टाईल या तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे आता वारंवार रस्ता खचण्याचा धोका संपला आहे.

Back to top button