कोल्हापूर: संविधान सन्मान समितीच्या वतीने शाहूवाडी तहसीलवर एल्गार मोर्चा | पुढारी

कोल्हापूर: संविधान सन्मान समितीच्या वतीने शाहूवाडी तहसीलवर एल्गार मोर्चा

सरुड : पुढारी वृत्तसेवा : धर्मांची स्थापना करणाऱ्यांनी कधी समाजात तेढ निर्माण होईल, असा भेदभाव केला नाही. मात्र गेल्या काही वर्षात भाजप सरकारने धर्माच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावण्या बरोबरच द्वेषाची बीजे रोवण्याचे काम केले आहे. भारतीय संविधान पायदळी तुडविणाऱ्यांच्या हातात सत्ता हेच आपल्या देशाचे दुर्दैव असल्याचा हल्लाबोल शेकापचे राज्य कार्यकारिणी सदस्य भाई भारत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला.

संविधान सन्मान समितीच्या पुढाकाराने शाहूवाडी तहसील कार्यालयावर आज (दि. ६) एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. वाढत्या महागाई, बेरोजगारीला राज्यकर्तेच जबाबदार असल्याचे, तसेच राज्यकर्ते हे अपयश झाकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग देत असल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.

शाहूवाडी पंचायत समिती प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली. आम्ही सारे भारतीय, संविधान बचाओ-देश बचाओ, महागाई कमी झालीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय…., अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी शाहूवाडी तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन देण्यात आले.

भारत पाटील म्हणाले, राष्ट्रीय महापुरुषांप्रति अवमानकारक आणि वादग्रस्त विधाने केली जात आहेत. राजसत्ता मुठभर धनिकांसाठी पायघड्या घालत आहे. देशात अघोषित हुकूमशाही सुरू आहे. यामुळे राज्यघटना वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.
नगरसेवक रमेश चांदणे, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील, राजाराम मगदूम, राजेंद्र देशमाने, श्रीकांत कांबळे, नामदेव पाटील, प्रा. प्रकाश नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार, सुरेश म्हाऊटकर, भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश कांबळे, हनुमंत कवळे, प्रा. शिवाप्पा पाटील, संदीप कांबळे, वसंत पाटील आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button