कोल्‍हापूर : गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाची पालखी डोंगराकडे रवाना | पुढारी

कोल्‍हापूर : गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाची पालखी डोंगराकडे रवाना

गडहिंग्लज: पुढारी वृत्तसेवा : काळभैरीच्या नावानं चांगभलं..ऽऽ’चा अखंड गजर… पी ढबाक… ढोलताशांचा निनाद… गुलालाची मुक्त उधळण आणि हजारो भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाच्या पालखी मिरवणुकीला आज (दि. ६) सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनी अपूर्व उत्‍साहात हा सोहळा आज साजरा होत आहे. यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. पालखीचे गडहिंग्लज शहरातून बड्याचीवाडी येथील डोंगरावरील देवालयाकडे प्रस्थान झाले. मंगळवारी (दि. ७) यात्रेचा मुख्य दिवस आहे.

आज सायंकाळी चार वाजता शहरातील मंदिरामध्ये मानकर्‍यांच्या उपस्थितीत विधीवत पूजेनंतर मिरवणूक सोहळ्यास प्रारंभ झाला. पी ढबाकऽऽ, ढोलताशांच्या गजरात अनेक मंडळे सहभागी झाली आहेत. आबालवृद्ध, महिलांनी ग्रामदैवताचे दर्शन घेण्यास गर्दी केली होती. काळभैरवाच्या सासनकाठीला रेशमी गोंडे बांधण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. छ. शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ, वीरशैव बँक चौकातून पालखी डोंगराकडे मार्गस्थ झाली. पालखीसोबत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. रात्री बाराला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार असून, त्यानंतर पहाटे मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे.

यात्रेचा उद्या मुख्य दिवस

मंगळवारी (दि. ७) काळभैरी यात्रेचा मुख्य दिवस आहे. शहरासह बड्याचीवाडी आणि हडलगे (ता. चिकोडी), बहिरेवाडी (ता. आजरा) या ठिकाणीही यात्रा साजरी केली जाते. यात्रा स्थळावर जाण्यासाठी एसटी आगाराने २५ बसेस उपलब्ध केल्या आहेत. यात्रा स्थळावर तात्पुरते बसस्थानकही उभारण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button