कोल्हापूर : सोहाळे सरपंचांचा नवा आदर्श; पाच वर्षांचे मानधन शाळेला | पुढारी

कोल्हापूर : सोहाळे सरपंचांचा नवा आदर्श; पाच वर्षांचे मानधन शाळेला

सोहाळे; सचिन कळेकर : कित्येक लोकप्रतिनिधी आपल्या भाषणातून अनेक आश्वासने देत असतात. मात्र सोहाळे (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. डेळेकर यांनी प्रजासत्ताकदिनी आपले पाच वर्षांचे मानधन ग्रुप ग्रामपंचायतीतील शाळेंना शैक्षणिक मदतीसाठी देण्याचे जाहीर केले. त्यांनी हा निर्णय घेवून जिल्ह्यातील सरपंच कसे असावेत याचा एक नवा आदर्श घातला आहे. आपले पाच वर्षाचे मानधन सामाजिक उपक्रमाकरिता देणाऱ्या भारती डेळेकर या जिल्ह्यातील पहिल्या सरपंच ठरल्या असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मागील महिन्यातच सोहाळे, सोहाळेवाडी व बाची ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये भारती डेळेकर या लोनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांचा २६ जानेवारी हा राष्ट्रीय ध्वजारोहणाचा पहिलाच कार्यक्रम. प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच डेळेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमानिमित्त सरपंच डेळेकर यांनी सरपंचपदाच्या आपल्या पहिल्या भाषणातच आपले पुढील पाच वर्षाचे सर्वच्या सर्व मानधन सोहाळे, सोहाळेवाडी व बाची येथील प्राथमिक शाळांना देत असल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामस्थांनी या निर्णयाचे कौतुक केले.

विशेषतः शाळेतील शिक्षणाचा दर्जा हा उत्तम असावा यासाठी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असून, मानधनमधूनही मदत कमी पडत असेल तर स्वतःकडून आर्थिक हातभार लावून शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे सरपंच डेळेकर यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच वसंत कोंडूसकर, ग्रा. पं. सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावच्या विकासासाठी प्रयत्नशील : सरपंच सौ. डेळेकर

सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सरपंच एवढे मोठे मानाचे पद मला मिळाले असून शिक्षणाबरोबरच गावातील नदी घाट, मुबलक पाणी, पाणंद रस्ते, वीज, स्वच्छतेकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहे. गावचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न राहतील असे सरपंच भारती डेळेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button