कोल्हापूर : नानीबाई चिखलीत जवान सुरज पोवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचा विधवा प्रथा बंदीचा निर्णय | पुढारी

कोल्हापूर : नानीबाई चिखलीत जवान सुरज पोवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचा विधवा प्रथा बंदीचा निर्णय

नानीबाई चिखली (कागल); पुढारी वृत्तसेवा : समाजात पतीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीच्या वेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडत पायातील जोडवी काढली जातात. तसेच महिलेस विधवा म्हणून कोणत्याही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. आजच्या युगात कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. पण या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येते व कायद्याचाही भंग होता. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने मागील वर्षी विधवा प्रथा बंद करण्याचा आदेश काढला होता. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे या करीता विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय नानीबाई चिखली ग्रामपंचायतीच्यावतीने २७ मे २०२२ रोजी घेतला होता. महाराष्ट्र शासन व नानीबाई चिखली ग्रामपंचायतीच्या निर्णयानुसार नानीबाई चिखलीतील दोनच दिवसांपूर्वी निधन पावलेल्या जवान सुरज पोवार यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

लेह लडाख येथे सैन्यदलात कार्यरत असणारे नानीबाई चिखलीतील जवान सुरज मारुती पाेवार याचे २५ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. सुरज यांच्या निधनानंतर त्याच्या पत्नीबाबत विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत सुरज यांच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणे न काढण्याचा निर्णय नानीबाई चिखलीतील पाेवार कुटुंबीयांनी घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा बंदी निर्णयानंतर कागल तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करणारी नानीबाई चिखली ही पहिली ग्रामपंचायत होती. तर चिखलीतील पाेवार कुटुंबीय हे गावातील पहिले कुटुंब आहे, की ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. भविष्यात पाेवार कुटुंबियातील महिलांच्या बाबतीत हा निर्णय लागू राहील असे पाेवार कुटुंबीयांच्यावतीने आजी-माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष बाजीराव पाेवार यांनी सांगितले.

पोवार कुटुंबीयांच्यावतीने तशी कल्पना नानीबाई चिखलीचे सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांना देण्यात आली असून सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांनी पाेवार कुटुंबीयांचे चिखली ग्रामपंचायतीच्यावतीने अभिनंदन केले आहे.

हेही वाचा

Back to top button