‘गोडसाखर’ वाचविणे माझे उत्तरदायित्व : हसन मुश्रीफ | पुढारी

‘गोडसाखर’ वाचविणे माझे उत्तरदायित्व : हसन मुश्रीफ

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : ‘गोडसाखर’च्या निवडणुकीमध्ये माझा कसलाही स्वार्थ नाही. हा कारखाना वाचविणे हे माझे उत्तरदायित्व आहे, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. हा कारखाना पुन्हा नव्या ताकदीने सुरू होऊन शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लागेल ते सहकार्य करू, असेही ते म्हणाले.

कडगाव येथे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी छ. शाहू समविचारी शेतकरी आघाडीच्या प्रचारार्थ सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सदानंद पाटील होते. सुदर्शन पाटील यांनी स्वागत केले.

आ. मुश्रीफ यांनी, गोडसाखर कारखान्याला गतवैभव मिळण्यासाठी डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छ. शाहू समविचारी शेतकरी आघाडीला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन केले.

डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, हजारो शेतकरी, सभासद आणि त्यांच्या कुटुंबाची जीवनदायिनी असलेल्या ‘गोडसाखर’च्या विजयाचे ऑपरेशनही व्यवस्थित यशस्वी करू. स्वाभिमानीचे नेते राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, हा कारखाना टिकला पाहिजे, वाचला पाहिजे आणि चालला पाहिजे या भूमिकेतूनच शेतकरी संघटनेने या आघाडीला पाठिंबा दिला आहे.

प्रकाश चव्हाण म्हणाले, विरोधी आघाडीकडून प्रचाराची पातळी खालावली आहे. त्यातूनच व्यक्तिगत निंदानालस्तीसह जात-पातीचे उकिरडे ते उकरत आहेत. दौलत कुणी बंद पाडला, अशी विचारणा चव्हाण यांनी केली.

जि. प.चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, आ. राजेश पाटील हे कारखाना सुरू करणार्‍यांच्या बाजूने मी निवडणुकीत आहे, असे सांगत आहेत. गेले वर्षभर हा कारखाना चालू करण्याच्या कोणत्याही हालचाली अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी केल्या नाहीत. कुठलीही आर्थिक व्यवस्था पाठीशी नसताना हा कारखाना चालू करून 15 कोटींच्या तोट्याच्या खाईत ढकलला. आ. पाटील यांनी त्याचवेळी ही व्यवस्था केली असती, तर ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती. दौलत साखर कारखाना कोणी कर्जबाजारी केला? सध्या सुरू असलेला दौलत साखर कारखाना बंद पाडण्याचे षड्यंत्र कोणी रचले, याची सगळी माहिती चंदगडच्या जनतेला आहे.

यावेळी प्रा. किसनराव कुराडे, मनसेचे नेते नागेश चौगुले, बाळासाहेब देसाई-मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. नेताजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. बंटी पाटील यांनी आभार मानले.

Back to top button