कोल्हापूर : उदगिरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार

शित्तूर वारूण : पुढारी वृत्तसेवा : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौथीत शिकणारी मुलगी ठार झाली. ही घटना उदगिरीपैकी केदारलिंगवाडी (ता. शाहूवाडी) जवळ आज (दि.२१) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. मनीषा रामू उर्फ राया डोईफोडे (वय १०, रा. पुसार्ले धनगरवाडा, ता. शाहूवाडी) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मनीषा डोईफोडे जनावरांना चारण्यासाठी केदारलिंगवाडीजवळ गेली होती. यावेळी झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या तीव्र जखमा दिसून येत होत्या.
ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. वनविभागाचे कर्मचारी प्रदीप वाडे, बळवंत बनसोडे यांनी या घटनेचा पंचनामा केला. मृतदेह मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक तपासात मुलीवर झालेला हल्ला बिबट्याचा असल्याचे दिसत आहे. या घटनेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.
– प्रदिप वाडे, वनरक्षक
हेही वाचा ?
- Money Laundering : अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती
- कोल्हापूर : बनाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सासूचा पराभव करून सून झाली सरपंच
- सोलापूर : तिर्हे मार्गे पंढरपूर-सातारा रस्ता ‘166 राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट’ व्हावा : खा. धनंजय महाडिकांची राज्यसभेत मागणी