कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. हे जैन धर्मियांचे पवित्र स्थान असून, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र न करता सरकारने हे पवित्र तीर्थस्थानाचे पावित्र्य जपावे,अन्यथा समाजाच्या वतीने शांतीच्या मार्गाने आंदोलने करण्यात येईल, असा इशारा देणारे निवदेन जैन बांधवांच्या वतीने मंडळ अधिकारी प्रतीक्षा ढेरे यांना देण्यात आले.
झारखंड सरकारने सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ कुरुंदवाड येथील समस्त जैन समाज बांधवांच्या वतीने आज (दि.२१) एकदिवसीय शहर बंदची हाक दिली होती. पालिका चौक, दर्गाह चौक, नवबाग रस्ता, सन्मित्र चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुन्हा पालिका चौकात फेरी आल्यानंतर निषेध सभेत रूपांतर झाले.
यावेळी अभिजीत पाटील म्हणाले, सम्मेद शिखरजी हे स्थान मुनी श्रींची पवित्र भूमी आहे. याठिकाणी जगभरातून श्रद्धेसाठी श्रावक, श्राविक येत असतात. या पवित्र स्थानाला सरकारने पर्यटन दर्जा देऊन, या पावित्र्याचा अपमान करण्याचा घाट रचला आहे. तो कदापि समाज बांधव होऊ देणार नाहीत. यासाठी समाजाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, या आंदोलनात शांततेच्या मार्गाने आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
यावेळी महावीर दिवटे,जवाहर पाटील अक्षय आलासे, सुरेश बिंदगे,बंडू उमडाळे,शैलेश व्होरा,दीपक पोमजे,अरुण भबीरे, कुमार पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत आपले सर्व व्यवहार बंद ठेवून समाज बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.