कोल्हापूर : तरसंबळे येथे एका प्रभागात २३ डिसेंबरला होणार फेर मतदान | पुढारी

कोल्हापूर : तरसंबळे येथे एका प्रभागात २३ डिसेंबरला होणार फेर मतदान

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील तरसंबळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधील एक ईव्हीएम मशीन मतमोजणीवेळी नादुरुस्त झाली. त्यामुळे या प्रभागासाठी शुक्रवार (दि. २३) रोजी फेर मतदान घेण्याचे आणि त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तरसंबळे येथे (दि. १८) डिसेंबर रोजी तीन प्रभागात सात जागा आणि थेट सरपंच पदासाठी मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग तीनमध्ये १५४ मतदान नोंद झाल्यानंतर ईव्हीएम बंद पडले होते. त्यानंतर दुसरे ईव्हीएम जोडण्यात आले. त्यामध्ये उर्वरित १५४ मतदान नोंद झाले. मात्र, मतमोजणीवेळी दुसरे एव्हीएम ओपन झालेच नाही. तज्ञाकडून ते ओपन करण्याचा प्रयत्न ही असफल झाल्याने तहसीलदार मीना निंबाळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे संपर्क साधून पुढील मार्गदर्शन मागवले होते.

सायंकाळी आयोगाकडून या प्रभागात फेर मतदान घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत या प्रभागात दोन सदस्य आणि थेट सरपंच पदासाठी मतदान होईल. येथील सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असून दोन आघाड्याकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी दोन जागांसाठीही चार महिला रिंगणात आहेत . शुक्रवारी २३ रोजी मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी राधानगरी मध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे. या मोजणीनंतर थेट सरपंच पदासह दोन जागांचा निकाल जाहीर होईल अशी माहिती तहसीलदार सौ मीना निंबाळकर यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button