कोल्‍हापूर : मुदाळच्या सरपंच पदावर के.पी.पाटील यांच्या तीन पिढयांचा दबदबा; ६३ वर्षात कुंटूबातील ६ जणांना संधी | पुढारी

कोल्‍हापूर : मुदाळच्या सरपंच पदावर के.पी.पाटील यांच्या तीन पिढयांचा दबदबा; ६३ वर्षात कुंटूबातील ६ जणांना संधी

मुदाळतिट्टा (कोल्‍हापूर ), प्रा.शाम पाटील : भुदरगड तालुक्याचे प्रवेशव्दार मुदाळ. या गावाची ख्याती अनेक चांगल्या उपक्रमांनी महाराष्ट्रभर चर्चेत राहीली आहे. माजी आमदार के.पी.पाटील यांचे हे गाव नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत के.पीं.च्या कौटूबिक पार्श्वभुमीवर सरपंचपदाच्या कारकीर्दीचा एक वेगळा आदर्श इथं पहायला मिळाला असं उदाहरण कदाचित जिल्हयात दुर्मिळ आहे.

के.पी. पाटील यांचे वडील परशराम बाळाजी पाटील हे मुदाळ चे सरपंच म्हणून १९५७ ते १९५९ तर १९६४ ते १९६७ अशा कालखंडात एकूण सहा वर्षात ग्रामविकासाची चांगली घडी बसविण्यात ते यशस्वी झाले. प.बा.पाटील यांनी घेतलेला हा ग्राम विकासाचा वसा ग्रामवासियाच्या मागणीवरुन सुपूत्र के.पी.पाटील यांच्या खांद्यावर दिला. सन १९७९ पासून के.पी.पाटील यांनी सरपंच पदाची सुत्रे खांद्यावर घेत राजकारणाची श्रीगणेशा केली.

१९९७ पर्यंतच्या कालखंडात तब्बल १९ वर्षे सरपंच पदावर दिलेले योगदान ग्राम विकासाला मोलाचं ठरलं. या अनुभवातूनच के.पी.पाटील यांचा १० वर्षाचा विधी मंडळाचा कारभार,बिद्री साखरचा प्रगती सारीपाठ,जिल्हा बँकेचे नेतृत्व,मतदारसंघात उभा केलेला औघोगिक प्रकल्प,अशा यशस्वी कामागीरी मुळे ते मुदाळच्या नावासह चर्चेत आहेत.

२००२ ते २००७ या काळात के.पी.पाटील यांच्या सुविद्य पत्नी मायादेवी कृष्णराव पाटील यांच्याकडे गावकारभाराची जबाबदारी बहूमतांनी दिली. त्यास पात्र रहात पाच वर्षात गावचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांनी दिलेले योगदान नक्कीच दृष्टीआड करता येण्यासारखं नाही.
त्यानंतरच्या काळात के.पी.पाटील यांचे सुपूत्र जिल्हाबॅक व गोकूळ संचालक रणजितसिंह पाटील यांचे कडे ग्रामवासियाच्या मागणीवरुन सन २००७ ते २००९ सरपंच पदाची जबाबदारी लोकशाहीच्या माध्यमातून दिली.

रणजितसिंह पाटील यांनी मुदाळची ग्रामपंचायत एक स्वायत्त ग्रामपंचायत असा दर्जा देत आपल्या कामाची एक वेगळी ओळख मुदाळला दिली. तद्नंतर के.पी.पाटील यांचे जेष्ठ सुपूत्र विकास कृष्णराव पाटील यांचेकडे मुदाळच्या सरपंचपदांची जबाबदारी २०१२ ते २०१६ या काळात आली. उच्चविद्याविभूषित असलेल्या विकासरावांना शासनाने यशवंत सरपंच या किताबाने गौरविले अनेक उपक्रमानी गावाला विधायक वळणावर नेणारे सरपंच म्हणून त्यांची कारकिर्द चर्चेत राहीली.

आत्ताच्या २०२२ च्या मुदाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे निवडणुकीत ग्रामवासियांनी धरलेला कमालीचा आग्रह व सर्वसाधारण महिला आरक्षणाचा लाभ आपल्याच कुंटूबात उच्चशिक्षित व समजूतदार असणाऱ्या के.पी.पाटील यांच्या स्नुषा राजनंदिनी विकासराव पाटील यांना उमेदवारी देण्याबद्दल झालेल्या ग्रामवासियांचा आग्रहाला कुंटूबातील सर्वांचा नाईलाज झाला. शेवटी या लढ़ाईत त्या सरपंच पदावर विक्रमी मताधिक्यानी विजयी झाल्या.

एकूणच १९५७ ते २०२२ या ६३ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात मुदाळच्या सरपंच पदावर के.पी.चा तीन पिढयाचा दबदबा या सरपंच पदांच्या कारकिर्दीने कायम राहीला असून असे उदाहरण दुर्मिळ असावं एवढं मात्र नक्की.

हेही वाचा 

Back to top button