Kolhapur Gram Panchayat Election | धैर्यशील माने यांनी त्यांच्या गावात गड राखला, कागलमध्ये मुश्रीफांना धक्का | पुढारी

Kolhapur Gram Panchayat Election | धैर्यशील माने यांनी त्यांच्या गावात गड राखला, कागलमध्ये मुश्रीफांना धक्का

रुकडी- कागल, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील ४२९ गावांचे सत्ताधारी कोण याचा फैसला आज मंगळवारी (दि. २०) होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने यांच्या या गावात त्यांनी गड राखला आहे. येथे माने गटाच्या रुकडी सरपंचपदाच्या उमेदवार राजश्री रूकडीकर विजयी झाल्या आहेत. तर कागल तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. (Kolhapur Gram Panchayat Election) बोरवडे, कसबा सांगाव, निढोरी, बामणी या गावांतील मुश्रीफ गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी चुरशीने ८४.१३ टक्के मतदान झाले होते. त्याचे निकाल आज जाहीर होत आहेत. राधानगरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी, ए वाय पाटील, काँग्रेस गट, मोरे गट, स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. हमिदवाडा (ता. कागल) येथे मंडलिक गटाचे कृष्णात बाबुराव बुरटे हे विजयी झाले आहेत. कागल तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या सेनापती कापशी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुश्रीफ गटाच्या उज्वला गंगाधर कांबळे या विजयी झाल्‍या आहेत. तेराहून अधिक जागा मुश्रीफ गटाला मिळालेल्‍या आहेत. कागल तालुक्यातील बोळावी येथे मुश्रीफ गटाचे सागर ज्ञानदेव माने, तर बाळेगाव येथे शिरसाप्पा गुंडाप्पा खतकले हे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. ठाणेवाडी येथे श्वेता भरत घोटणे या प्रवीण सिंह पाटील यांच्या गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्‍या आहेत.

जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ३० ग्रामपंचायती तर ६० सरपंच बिनविरोध झाले. शाहूवाडी-चनवाड ग्रुप ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. यामुळे ४२९ ग्रामपंचायतींसाठी आणि ४१३ सरपंचपदासाठी मतदान झाले. गावच्या वर्चस्वासाठी महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षात टोकाला गेलेल्या ईर्ष्येने अनेक गावांतील निवडणूक चुरशीची झाली. स्थानिक गट, आघाड्याचे प्रमुख असलेल्या नेत्यांची तसेच राजकीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. (Kolhapur Gram Panchayat Election)

हे ही वाचा :

Back to top button