कोल्हापूर : नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर गुडाळवाडीतील शाळेला तरुणाची रशियातून मदत | पुढारी

कोल्हापूर : नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर गुडाळवाडीतील शाळेला तरुणाची रशियातून मदत

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेची एक आदर्श प्राथमिक शाळा ठरलेल्या गुडाळवाडीतील विद्या मंदिर,  शाळेची माहिती फेसबुकच्या माध्यमातून रशियामध्ये नोकरीनिमित्त असलेल्या पुण्यातील एका तरुणाने पाहिली. आणि तेथून थेट मुख्याध्यापक विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांनी शाळेसाठी संगणक आणि वॉटर प्युरिफायरसाठी तब्बल सव्वा लाख रुपयांची मदत पाठवून दिली. तेही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर!

गुडाळवाडी येथील विद्यामंदिर शाळेत पूर्वाश्रमीचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील आणि विद्यमान मुख्याध्यापक विक्रम पाटील (गुडाळकर) यांनी शैक्षणिक उठाव योजनेअंतर्गत अमुलाग्र सुधारणा केल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. विशेष म्हणजे ही शाळा सध्या एक शिक्षकी आहे.

अलीकडेच पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यांने सर्व मुलांना अद्ययावत स्टडी टेबल भेट दिली आहेत. शाळेचे कृतिशील मुख्याध्यापक विक्रम पाटील यांनी यासंदर्भात एक पोस्ट फेसबुक वर फॉरवर्ड केली होती. त्याची दखल घेऊन रशियामध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य करणाऱ्या पुणे येथील एका तरुणाने पाटील यांच्याशी संपर्क साधला. भविष्यात प्राथमिक शिक्षण ऑनलाईन होणार असल्याचे भाकीत करत त्यांनी शाळेला संगणक देण्याची इच्छा व्यक्त केली. तातडीने कोटेशन मागवून तीन संगणक संचासाठी १ लाख रुपये अदाही केले. संगणक बसवल्यानंतर आठवडाभरात पुन्हा वॉटर प्युरिफायर साठी २५ हजार रुपये अदा केले. मात्र, या अज्ञात उदारदात्याने आपले नाव कुठेही प्रसिद्ध किंवा जाहीर न करण्याची विनंती मुख्याध्यापक पाटील यांना आवर्जून केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button