Delhi MCD Election Results 2022 | भाजपला धक्का! दिल्ली महापालिकेत १५ वर्षानंतर सत्तांतर, ‘आप’ची बाजी

Delhi MCD Election Results 2022 | भाजपला धक्का! दिल्ली महापालिकेत १५ वर्षानंतर सत्तांतर, ‘आप’ची बाजी
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; देशाची राजधानी दिल्लीतील तीन महानगर पालिकांच्या एकत्रिकरणानंतर पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या दिल्ली महापालिका (Delhi MCD Election Results 2022 ) निवडणुकीचा  निकाल आज बुधवारी (दि.७) जाहीर झाला. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आम आदमी पक्षाने बहुमताचा १२६ चा आकडा पार केला आहे. तर भाजपने ९७ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ ६ जागांवर विजय मिळवता आला आहे. तीन जागांवर अपक्ष जिंकले आहेत. १५ वर्षानंतर महापालिकेत सत्तांतर झाले असून आपने भाजपकडून सत्ता खेचून आणली आहे.

दुपारी २ वाजता हाती आलेल्या निकालानंतर, AAP ने १३० जागा जिंकल्या आहेत आणि चार जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली महापालिकेमध्ये २५० प्रभाग आहेत आणि बहुमताचा आकडा १२६ आहे. या विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत जल्लोष केला. या दणदणीत विजयाबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आता आम्ही सर्वांनी मिळून दिल्लीला स्वच्छ आणि सुंदर बनवायची आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. 'आप'ने दिल्लीला चांगले शिक्षण दिले, आरोग्यसेवा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तर हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. "दिल्ली MCD मध्ये आम आदमी पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनःपूर्वक आभार…जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा पराभव करून दिल्लीच्या जनतेने कट्टर, प्रामाणिक आणि कष्टकरी अरविंद केजरीवाल यांना जिंकून दिले आहे. आमच्यासाठी हा केवळ विजय नसून मोठी जबाबदारी आहे." असे सिसोदिया यांनी ट्विट करत म्हटले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे की, आम आदमी पक्षाने अगोदर दिल्लीतून काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता उखडून टाकली होती. आता एमसीडीमधील भाजपकडील १५ वर्षांची सत्ता खेचून आणली आहे. याचा अर्थ असा की द्वेषाचे राजकारण लोकांना आवडत नाही. लोक वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधांसाठी मतदान करतात.

खोटे खटले, खोटे आरोप आमचा विजय रोखू शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे.
अबूल फजलमधून काँग्रेसच्या उमेदवार अरिबा खान विजयी झाल्या आहेत. त्याचे वडील आसिफ खान निवडणुकीदरम्यान पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. झाकीर नगरची जागाही काँग्रेसने मिळवली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या शकूरबस्ती मतदारसंघातील सरस्वती विहार, पश्चिम विहार आणि राणीबाग या तीनही जागा भाजपने जिंकल्या आहेत. सत्येंद्र जैन यांच्या मतदारसंघातील तीनही प्रभाग 'आप'ने गमावले आहेत.

सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी पालिकेत यंदा आम आदमी पक्ष सत्तारूढ होणार असल्याची शक्यता वर्तवली होती आणि निकालानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरले आहेत. दिल्लीतील निवडणुकीतील आप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Delhi MCD Election Results 2022)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news