

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळावरून लवकरच कार्गो सेवा (cargo service) सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विमानतळावरून हैदराबाद, मुंबई, बंगळूर, अहमदाबाद, तिरुपती या मार्गांवर सध्या प्रवासी विमानसेवा सुरू आहे. प्रवासी विमानसेवेतून मालवाहतूकही केली जाते, अशी सेवा कोल्हापूर विमानतळावरूनही सुरू करावी, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांनी नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली होती.
पाटील यांनी आज विमानतळ प्राधिकरणार्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानुसार लवकरच कार्गो सेवेसाठी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर ही सेवा सुरू होणार आहे. कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सेवा (cargo service) सुरू झाल्यास त्याचा उद्योजक, व्यापारी,
शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.
कोल्हापूर विमानतळावरून शिर्डी, नागपूर, गोवा-पुणे व्हाया कोल्हापूर, जोधपूर, जयपूर, दिल्ली आणि म्हैसूर या मार्गावर विमानसेवा सुरू करावी, अशी मागणीही पाटील यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासह नाईट लँडिंग सुविधा, नाईट पार्किंग, हँगर, एअरबस एबी 320 प्रकाराच्या विमानाचे दळणवळण आदींची मागणीही या पत्रकाद्वारे त्यांनी केली आहे.
या पत्रात विमानतळाच्या टर्मिनस इमारतीचे बांधकाम संथ सुरू असल्याचे सांगत त्याची गती वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. हे काम त्वरेने पूर्ण करा, असेही त्यांनी सांगितले.