पन्हाळ्यात सेल्फी पाॅइंटच्या नावाखाली ६६ लाखांची उधळपट्टीचा घाट : ग्रामस्‍थांकडून चौकशीची मागणी | पुढारी

पन्हाळ्यात सेल्फी पाॅइंटच्या नावाखाली ६६ लाखांची उधळपट्टीचा घाट : ग्रामस्‍थांकडून चौकशीची मागणी

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा क्लब समोरील रस्त्यावर सेल्फी पॉइंटसाठी 66 लाख रुपयाची सेल्फी भिंत उभारण्यात येत आहे. गेले अनेक वर्षापासून वापरात असलेला रहदारीचा रस्ता पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेकडून बंद केला जाणार आहे. त्‍यामूळे याबाबत स्‍थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पन्हाळ क्लब समोर न्यायालय परिसरात एक रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून 66 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधीच्या माध्यमांतून पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे. हे काम पन्हाळा विकास आराखड्याच्या विरोधात जाऊन केले जात असून हा भाग विकसित केला जात आहे.या सेल्फी पॉईंटला नागरीक तसेच माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा विरोध केला जात आहे.

नगरपालिकेची लोकनियुक्त प्रतिनिधी बॉडी अस्तित्वात असताना या सेल्फी पॉइंटला विरोध झाला होता. तेव्हा नगरसेवक चैतन्य भोसले यांनी आक्षेप नोंदवत याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयात देखील अर्ज दाखल केला होता. हा न्यायालयाचा परिसर असून हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित असताना या ठिकाणी पर्यटकांचे मनोरंजनाची सेल्फी पॉईंट करण्यात येऊ नये. ही मनोरंजक गोष्ट या ठिकाणी उभारण्यात आली तर वर्षानुवर्षे सुरू असलेला रहदारीचा रस्ता बंद होणार आहे. तसेच न्यायालयाच्या कामकाजावर व येथे राहत असलेल्या कर्मचारी, न्यायाधीश व नागरिकांवर गोंगाटामुळे त्रास होणार आहे, असे निवेदन चैतन्य भोसले यांनी सादर केले होते.

सभागृहात या रस्त्याला विरोध असेल तर हे काम करण्यात येणार नाही असे देखील ठरले. मात्र पन्हाळ नगर परिषदेवर प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या तत्कालीन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सर्व कायदेशीर बाबींना दुर्लक्ष करत 66 लाख रुपयाचा सेल्फी पॉइंट उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. या कामाच्या ठेकेदारास वर्क ऑर्डर देण्यात आले आहेत. ठेकेदाराची जबाबदारी ओळखून त्याने पुन्हा कामास सुरुवात केली असल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी दै. पुढारीशी बोलताना म्‍हणाले, “पन्हाळगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूंवर सेल्फी घेण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात. हे वास्तव असताना जाणीवपूर्वक पैशाची उधळपट्टी करण्यासाठी सेल्फी पॉईंट बनवण्याचा घाट आहे. यातून निव्वळ पन्हाळकरांची लूट केली जात आहे.” माजी नगरसेवक चैतन्य भोसले म्‍हणाले, “स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मिळालेले निधीतून 66 लाख रुपये विनाकारण उधळले जाऊ नये याबाबत तीव्र आंदोलनाचा व योग्य त्या दरबारी दाद मागण्याचा प्रयत्न आपण करत आहोत”.

पन्हाळा येथे सेल्फी पॉइंट उभारण्याची गरज नसताना रहदारीचा व पूर्वापार असलेला 18 फुटी रस्ता या सेल्फी पॉईंटमुळे बाधित झाला आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूने दोन-दोन फुटाचे कठडे बांधण्यात आले आहेत.  या रस्त्याच्या मध्‍यभागी एक डेरेदार झाड देखील आहे वाहतुकीस या सर्वाचा अडथळा होत असून तातडीने या ठिकाणाचा सेल्फी पॉईंट रद्द करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

पन्हाळा नगरपालिकेच्या सर्वच कामांची खास समितीमार्फत जिल्हा अधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पन्हाळा प्रमुख मारुती माने यांनी केली आहे. पन्हाळगडावर पर्यटनाच्या दृष्टीने विकास गरजेच आहे. मात्र नागरिकांचा विचार देखील जरुरीचा असून मनमानी कारभार करून पैशाची उधळपट्टी होऊ नये, असे माजी नगरसेवक चेतन भोसले म्‍हणाले.

या ठिकाणी सुरू असलेल्या 66 लाखाच्या सेल्फी पॉईंटच्या कामाची प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक विध्या कदम यांनी पाहणी केली व सदरचे काम तात्पुरत्या स्वरूपात बंद करत असल्याचे सांगितले. मात्र हा सेल्फी पॉइंट कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी असल्याने नागरिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र आहेत.

हेही वाचा

 

Back to top button