केडीसीसी बँकेने शेतकऱ्यांची सक्तीने ठेव पावती केल्यास तीव्र आंदोलन : भाजपचा इशारा | पुढारी

केडीसीसी बँकेने शेतकऱ्यांची सक्तीने ठेव पावती केल्यास तीव्र आंदोलन : भाजपचा इशारा

दत्तवाड: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा होऊ लागले आहे. परंतु, दत्तवाड येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या मर्जीविरोधात सक्तीने ठेव पावती करून घेतली जात आहे. ही ठेव पावती घेण्यास शेतकऱ्यांना सक्ती करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

दत्तवाड भाजपच्या वतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दत्तवाड शाखेच्या शाखाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना, महापूर, अतिवृष्टी आदीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातून सावरण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ होणार आहे. अनुदान जमा करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. परंतु, जिल्हा बँकेने ठेव पावती करण्याची सक्ती शेतकऱ्यांना करू नये. सद्यस्थितीत शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना पैशांची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत जमा झालेली पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देऊन सहकार्य करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी भाजप शिरोळ तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष अॅड. सुरेश पाटील, निखिल जोशी, कुमार गिऱ्याप्पा, अशोक नेरले, अजित वठारे, अशोक पाटील, नितीन खरपी, तेजस वराळे आदीसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?  

Back to top button