

वडणगे : पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर छ. शिवाजी पूल ते केर्ली गावापर्यंत रस्त्यावर पावसामुळे मोठ -मोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. छ.शिवाजी पूल, वडणगे फाटा, आंबेवाडी ते रजपुतवाडीपर्यंत दिवसा व रात्री भरधाव जाणाऱ्या वाहनांना हे खड्डे लक्षात न आल्याने या मार्गावर गेल्या महिनाभरात सुमारे २० हून अधिक लहान- मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांमध्ये संतप्त भावना आहेत. दरम्यान, रजपूतवाडी येथील ग्रामस्थांनी प्रवाशांना खड्डे लक्षात येण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी खड्ड्यांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावले आहेत. परंतु हे बॅरिकेट्स वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
दिवाळी सण सुरू असल्याने गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावरील वर्दळीत वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. याबाबत रजपुतवाडी ग्रामस्थांनी रस्ते विकास प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, काही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी कोल्हापूर महापालिकेची बॅरिकेट्स उपलब्ध करून रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खड्ड्यासमोर लावली. यामुळे वाहतुकीस पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर त्वरित पॅचवर्क करण्याची मागणी होत आहे.
अनधिकृत विक्रेते व फलकांनी होतेय वाहतूक कोंडी
कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर छ. शिवाजी पूल ते आंबेवाडी यादरम्यान रस्त्याच्या बाजूला अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. याशिवाय अनेक हॉटेल व्यवसायिक व अन्य व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या अगदी बाजूला उभा केलेल्या फलकांमुळे हा रस्ता झाकोळला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोल्हापूर- रत्नागिरी रस्त्याची खड्ड्यामुळे सध्या दुरवस्था झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्याचे पॅचवर्क करता आलेले नाही. येत्या दोन दिवसात पॅचवर्कच्या कामास सुरुवात होईल.
– व्ही. एन. पाटील, अभियंता, रस्ते विकास प्राधिकरण
हेही वाचलंत का ?