

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बुधवारी होणार्या दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी कोल्हापूरची बाजारपेठ सज्ज झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसह सोने, इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तू, गॅझेट्स आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी ग्राहक आतूर झाले आहेत. पाडव्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.
ग्राहकांसाठी खास आकर्षक सवलतींसह विविध एक्स्चेंज ऑफर्स देण्यात आल्यामुळे खरेदीला उधाण येणार आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकांनी वाहनांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. पाडव्यानिमित्त एक्स्चेंज ऑफरसह कमीत कमी डाऊनपेमेंट या सुविधेला ग्राहकांकडून अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे.
पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुंजभर सोन्यापासून ते वजनदार दागिन्यांच्या खरेदीसाठी होणार्या गर्दीने शहरातील गुजरीसह सराफ बाजारपेठ फुलून जाणार आहे. लग्नाच्या दागिन्यांच्या खरेदीलाही अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तालाच पसंती दिल्यामुळे गुजरी सोने खरेदीने लखलखणार आहे. पंधरा दिवसांपूर्वीच दसर्याचा मुहूर्त साधत झालेल्या खरेदीच्या उत्साहाचे पुढचे पर्व दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने दिसून येणार आहे. चांदीच्या वस्तूंचीही खरेदी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात होणार आहे.
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या गिफ्ट खरेदीसाठी सोमवारी शहरातील स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मार्केट गर्दीने गजबजली होती. स्मार्टफोन खरेदीमध्ये दसर्यात झालेल्या खरेदीपेक्षा दिवाळी पाडव्याला काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब, पॉवर बँक, होम थिएटर, एलईडी टीव्ही तसेच 5-जी मोबाईल, आयफोन आणि अधिकाधिक फीचर्स असलेल्या फोनला मागणी वाढण्याची शक्यता आहे.