कोल्हापूर : महापालिका निवडणूक फेब्रुवारीत? | पुढारी

कोल्हापूर : महापालिका निवडणूक फेब्रुवारीत?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना केली असली तरी ती बदलून चार सदस्यांचा एक प्रभाग होईल, असेही सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास महापालिकेने यापूर्वी केलेली सर्व प्रभाग रचना आणि आरक्षणही बदलेल. दरम्यान, प्रभाग रचनेविषयी असलेली न्यायालयीन बाब आणि ओबीसी आरक्षणाविषयी सुनावणी यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबूनअसणार आहे.

महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली. त्यानंतर कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. परिणामी राज्य शासनाने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. कोरोना कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार डिसेंबर 2020 रोजी एक सदस्य प्रभाग रचना प्रसिद्ध करून आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. मतदार याद्याही अंतिम झाल्या होत्या. मात्र फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये पुन्हा निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश आले. तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार 7 ऑक्टोबर 2021 ला त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार महापालिकेची प्रभाग रचना करण्यात आली. नगरसेवकांची संख्या मात्र 81 ठेवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर शहरातील सुमारे सहा लाख लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांची संख्या 92 करण्यात आली. त्यानुसार प्रत्येकी 3 नगरसेवकांचे

30 प्रभाग व 2 नगरसेवकांचा 1 असे 31 प्रभाग करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण वगळून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तोपर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार आता पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांची संख्या 81 करण्यात आली आहे. परंतु ओबीसी आरक्षणाचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे पुन्हा निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

Back to top button