कोल्‍हापूर : दत्तवाड येथील तंटामुक्त अध्यक्ष निवड बिनविरोध व्हावी; ग्रामस्थांची मागणी | पुढारी

कोल्‍हापूर : दत्तवाड येथील तंटामुक्त अध्यक्ष निवड बिनविरोध व्हावी; ग्रामस्थांची मागणी

दत्तवाड :  पुढारी वृत्तसेवा ; गावागावातील तंटे गावातच मिटावेत या उद्देशाने शासनाने स्थापन केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती मध्येच अध्यक्षपदाच्या निवडणूक होणार आहेत. निवडणूकीवेळी तंटे होऊ नयेत, गावात शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून सदर निवड ही बिनविरोध व्हावी, अशी मागणी दत्तवाड ग्रामस्थांनी केली आहे. बुधवार ( दि.१९) ऑक्टोबर रोजी अध्यक्षपद निवडणूक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  सहा उमेदवारांनी अर्ज भरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

दत्तवाड येथे तंटामुक्त समिती स्थापन झाल्यापासून अध्यक्षपदाची निवड ही नेहमीच बिनविरोध झाली आहे. मात्र यंदा प्रथमच अध्यक्षपद निवड वरून चुरस निर्माण झाली आहे. तंटामुक्त अध्यक्षपदासाठी तंटामुक्त सदस्य व ज्येष्ठ नागरिक मौला नदाफ, प्रधानमंत्री जलकल्याण योजना जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासो कोकणे व राजेंद्र व्हसकल्ले, संजय मऱ्याप्पा कांबळे, रवींद्र कांबळे असे एकूण सहा अर्ज ग्रामपंचायत मध्ये आले आहेत. या उमेदवारांना गावातील विविध गट व संघटनांनी पाठिंबा दिल्याने या निवडीबाबत गावात ठिकठिकाणी चर्चा रंगल्या आहेत.

सर्वच उमेदवारांची ही निवड बिनविरोध व्हावी अशी इच्छा आहे. मात्र अद्याप कोणीही माघार घेतलेले नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या बाजूने अधिकाधिक समर्थन मिळावे या उद्देशाने प्रयत्न करताना दिसत आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी व लोकप्रतिनिधींनी तंटामुक्त अध्यक्ष निवडी बाबत गावात निर्माण झालेली गोंधळाची स्थिती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत व ही निवड बिनविरोध करावी, अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थातून होत आहे.

हेही वाचा

Back to top button