इचलकरंजी : लम्पीग्रस्त गायींना जीवदान, गो-पालकाकडून २० हजारांची औषधे भेट
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा इचलकरंजी परिसरात लम्पीतून पशूधन वाचवण्यासाठी सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत. आयुर्वेदिक लाडूनंतर शासकीय दवाखान्यास मोफत औषधांचा ओघ सुरू झाला आहे. अथक प्रयत्नानंतर गायींना जीवदान दिल्याबद्दल हातकणंगले येथील गोपालक शामसुंदर मर्दा यांनी लम्पीवर प्रभावी ठरणारी 20 हजार रुपयांची औषधे देवून पशूवैद्यकांच्या धडपडीला बळ दिले आहे.
हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत मर्दा यांनी गायींचे संवर्धन केले आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांच्याकडील देशी गायींना लम्पीची बाधा झाली होती. हातकणंगले येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवास वट्टमवार, परिचर आर.एस.पोवार यांनी १५ दिवसांपासून जिद्दीने उपचार करून गायींना जीवदान दिले. त्यांनी आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ गायी लम्पीमुक्त केल्या आहेत. जीवापाड जपलेले गोधन वाचवण्यात पशुवैद्यकांची धडपड पाहून मर्दा यांनी मदतीचा हात दिला आहे. आणखी शक्य तितकी मदत करू. परंतु बळीराजाचे गोधन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवा, अशी आशा मर्दा यांनी व्यक्त केली.
गोधन वाचले तर बळीराजाला आधार मिळणार आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील दातृत्वांनी पुढे यावे.
– डॉ.श्रीनिवास वट्टमवार
पशुवैद्यकीय अधिकारी

