‘शाहूवाडी’त ३ वर्षात १९३० महिलांची, तर ३४ पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया

‘शाहूवाडी’त ३ वर्षात १९३० महिलांची, तर ३४ पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया

विशाळगड : सुभाष पाटील : शाहूवाडी तालुक्यात नसबंदीच्या संख्येत गेल्या काही वर्षात मंद गतीने का होईना, पण वाढ होत  आहे. गेल्या तीन वर्षात १ हजार ९३० महिलांनी तर ३४ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली. 'अंतरा' इंजेक्शनचे ६३ तर 'छाया' चे ८० लाभार्थी आढळून आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये स्त्री नसबंदीत तब्बल २०० ने तर पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेत १६ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण अत्यल्प असले, तरी २०२२-२३ मध्ये १९ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचबरोबर 'अंतरा' इंजेक्शन व 'छाया' गोळ्या या गर्भनिरोधकांच्या वापरांकडेही नागरिक वळत असल्याचे दिसून येत आहे.

कुटुंब नियोजनासाठी स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी केली जाते. तसेच पाळणा लांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या, निरोध, तांबी यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर डेपो मेड्रॉक्सि प्रोजेस्टेरॉन अर्थात अंतरा' इंजेक्शन आणि गर्भनिरोधक गोळी अर्थात 'छाया' सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन दिल्या जातात. पाळणा लांबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अंतरा' इंजेक्शनच्या लाभार्थीमध्ये म्हणावी तशी वाढ झालेली नाही. तर छाया गोळ्या घेणाऱ्या लाभार्थीमध्ये घसरण झाली आहे.

काय आहे 'अंतरा' आणि 'छाया'

कुटुंब नियोजन करू इच्छिणाऱ्या महिलांना दर तीन महिन्यांनी 'अंतरा' इंजेक्शन पुरविले जाते. आणि दर आठवड्याला 'छाया' गोळ्याही सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन दिल्या जातात. दोन्ही गर्भनिरोधके सुरक्षित असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

अंतरा' टोचा, तीन महिने बिनधास्त राहा

कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. शस्त्रक्रिया न करता गर्भधारणा टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येते. हे इंजेक्शन घेतल्यानंतर महिलांना तीन महिने गर्भधारणेची चिंता राहत नाही.

अंतरा इंजेक्शनचा दुष्परिणाम नाही

कुटुंब नियोजनासाठी अंतरा इंजेक्शन हा सुरक्षित पर्याय आहे. इंजेक्शनमुळे आईच्या दुधावर कोणताही विपरित परिणाम होत नाही. लग्नानंतर पहिले अपत्य उशिरा किंवा दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी या इंजेक्शनचा चांगला वापर होतो. हे इंजेक्शन वापरल्यानंतर शारीरिकदृष्ट्या कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. त्यामुळे हे इंजेक्शन सुलभ असल्याचे स्त्री-रोगतज्ज्ञ सांगतात.

अंतराचा वापर केव्हा?

तीन महिन्यांत एकदा व वर्षातून चार अंतरा इंजेक्शनद्वारे गर्भधारणा रोखली जाते. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये एखादी गोळी चुकली. तर गर्भधारणा होण्याचा संभव अधिक असतो. मात्र, अंतरा इंजेक्शनमुळे हे टाळता येणे शक्य आहे.

गर्भपातापेक्षा गर्भनिरोधकांचा व्हावा वापर

गर्भपात करण्यापेक्षा गर्भनिरोधकांचा वापर वाढावा, यादृष्टीने कुटुंब कल्याण विभागाने या इंजेक्शनच्या वापरासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले आहेत. इंजेक्शनचा वापर थांबवल्यानंतर ७ ते १० महिन्यांनी पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. प्रसूतीनंतरच्या कालावधीमध्ये स्तनदा मातांसाठीही ते उपयुक्त आहे.

 अंतरा आणि छाया लाभार्थी-

वर्ष                 अंतरा         छाया
२०२०-२१         २१            ४०
२०२१-२२         २०            २३
२०२२-२३         २२            १७

 नसबंदी शस्त्रक्रियांचे आकडे –

वर्ष                 स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया     पुरुष नसबंदी
२०२०-२१              ५७१                            ९
२०२१-२२              ५७९                            ६
२०२२-२३              ७८०                          १९

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत तालुक्यात सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. बालमृत्यू  आणि मातामृत्यू रोखणे, दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणे, कुटुंब नियोजनाच्या योजनांचा लाभ यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यावरही भर दिला जात आहे.

  • डॉ. एच. आर. निरंकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाहूवाडी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news