सारथीच्या योजनांची माहिती गावसभेतून देण्यास मराठा संघटनांचा विरोध | पुढारी

सारथीच्या योजनांची माहिती गावसभेतून देण्यास मराठा संघटनांचा विरोध

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजासाठी सुरु असलेल्या सारथीच्या योजनांची माहिती २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी गावसभेत दिली जाणार आहे. यास मराठा संघटनांनी कडाडून विरोध करण्यास सुरवात केली आहे. याबाबत उपसचिव एस. जी. लोंढे यांनी काढलेले आदेश मागे घ्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.

मराठा आरक्षणाचा विषय मागे पडल्यानंतर राज्य सरकारने समाजासाठी शैक्षणिकसह अन्य योजनांची घोषणा केली. याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने सारथी संस्था सुरु केली आहे. मुख्यालय पुणे, उपकेंद्र कोल्हापूर आणि राज्यातील आठ विभागीय कार्यालयातून योजनांची अंमलबजावणी सुरु आहे.

केंद्र, राज्या-राज्यात विविध कल्याणकारी योजना राबण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतींना विशेष अधिकार दिले आहेत. बहुतांशी मराठा, कुणबी- मराठा समाज हा ग्रामीण भागात राहत आहे. त्यामुळे सारथीच्या योजना जास्तीत-जास्त मराठा तरुणांपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सारथीच्या योजनांची माहिती ग्रामसभेच्या माध्यमातून देण्याची सरकारची संकल्पना आहे. मात्र, केवळ मराठा समाजाच्या योजनांची माहिती गावसभेसमोर का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत ईमेल द्वारे राज्य शासनाकडे हरकती नोंदवण्यास सुरवात झाली आहे.

अन्य समाजाच्याही योजना जनतेसमोर याव्यात

केवळ मराठा समाजाच्या योजना जनतेसमोर आणून सामाजिक तेढ वाढवण्याचाच हा प्रकार आहे. हे करणार असाल, तर अन्य समाज घटकांना मिळणार्‍या सवलती, आदींची माहिती जनतेसमोर आली पाहिजे.
– विवेक कराडे, कराड (ओबीसीतून मराठा आरक्षण संघटना)


हेही वाचलंत का ? 

Back to top button