कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू; घातपाताचा संशय | पुढारी

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू; घातपाताचा संशय

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बालिंगा ते शिरोली दुमाला रोडवर पाडळी खुर्द (तालुका करवीर) येथील बिगा नावाच्या शेतात शुक्रवार पेठ परिसरातील आरती आनंद सामंत (वय ४५, राहणार जैनमठ गल्ली, कोल्हापूर) या महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आज शुक्रवारी दुपारी आढळून आला. घातपाताचा प्रकार असावा असा पोलिसांना संशय आहे. करवीर पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला आहे.

पाडळी खुर्द येथील राजवर्धन सदाशिव पाटील यांच्या मालकीच्या शेतात मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरावर शेतातील बंधारा लगत 45 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना आज सकाळी आढळून आला.

पोलीस पाटील यांनी तात्काळ करवीर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या आयडीकार्डमुळे मृतदेहाची ओळख पटली असून आरती अनंत सामंत असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बालिंगा -शिरोली दुमाला रस्त्यावर महिलेची मोपेडही आढळून आली आहे. या मोपेडपासून पाचशे मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह बंधारालगत पडलेला होता. डोक्याच्या मागील बाजूला खोलवर जखम झाली असून त्यातून रक्तस्त्राव सुरू होता. याशिवाय हातालाही खरचटल्याचे व्रण दिसून येत होते.

प्राथमिक चौकशीत हा घातपाताचा प्रकार असावा असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा संशय आहे. महिलेच्या अंगावरील तसेच गळ्यातील दागिनेही लंपास करण्यात आल्याचे दिसून येते. उत्तरीय तपासणीनंतर निश्चित कारण समजू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले.

आरती सामंत ही महिला आंबेवाडी येथील असून त्यांचे सध्याचे वास्तव्य शुक्रवार पेठ येथील जैन मठ गल्लीत आईकडे असते. त्यांना दोन मुले असून त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले आहे. तर दुसरी मुलगी पुण्यात शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे कुटुंबीय कमालीचे हादरले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button