करंजी येथील सराफाला केळपिंपळगाव जवळ लुटले, मारहाणीत सराफ दाम्पत्य गंभीर जखमी | पुढारी

करंजी येथील सराफाला केळपिंपळगाव जवळ लुटले, मारहाणीत सराफ दाम्पत्य गंभीर जखमी

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील सराफास मारहाण करीत तिघांनी त्यांच्या जवळील रोख रकमेसह सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत. मारहाणीत दीक्षित दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगरला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  लेमकांत निवृत्ती दीक्षित व त्यांची पत्नी सुनीता दीक्षित यांचे दौलावडगाव (ता.आष्टी) येथे सराफी दुकान आहे. ते दररोज करंजी ते दौलावडगाव असा मोटरसायकलवरून प्रवास करतात. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास दौलावडगाव ते बारव रस्त्यावरील केळपिंपळगाव जवळ पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी दीक्षित यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना खाली पाडले.

तसेच, त्यांच्या पत्नीलाही जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील रोख रकमेसह सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने या तिघांनी लंपास केले. या घटनेत दीक्षित दांपत्य गंभीररित्या जखमी झाले आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ नगरला खासगी रुग्णालयात दाखल केले. या चोरट्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेलार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष जालिंदर वामन यांनी केली आहे.  दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, जखमी दीक्षित दाम्पत्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस नगरला रवाना झाले आहेत. त्यांच्या जबाबानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवून निश्चित आरोपींचा शोध घेऊ, असे अंभोर्‍याचे पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी सांगितले.

Back to top button