कोल्हार खुर्द : पाणी योजना अडकली राजकीय चक्रव्यूहात ; माशी शिंकली कुठे? ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा | पुढारी

कोल्हार खुर्द : पाणी योजना अडकली राजकीय चक्रव्यूहात ; माशी शिंकली कुठे? ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा

कोल्हार खुर्द : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द, चिंचोली संयुक्त पाणी योजना मंजूर झाली. निविदा झाल्या, असे सर्वकाही ठिक असताना या योजनेचे काम सुरू होत नसल्याने दोन्ही गावांच्या लाभार्थींना या योजनेचे काम सुरू का होत नाही, याचे कोडे पडले आहे. ही पाणी योजना होणार म्हणून लाभार्थी ग्रामस्थ आनंदी झाले, मात्र सुप्त राजकीय कलाहात ही योजना पाण्यातच बुडते की काय, अशी परिस्थिती पाहावयास मिळते आहे. कोल्हार खुर्द व चिंचोली ही दोन्ही गावे प्रवरा नदीकाठी व दोन्ही गावांच्या एका बाजूने प्रवरा उजवा कालवा गेला आहे. त्यामुळे या गावांना पाणी मुबलक असूनही पिण्याच्या पाण्यासाठी कायमच येथे संघर्ष पाहावयास मिळतो. कोल्हार खुर्दची पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी समस्या असल्याने ही योजना अस्तित्वात आली तर काही वर्षे तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे ग्रामस्थांना वाटत आहे.

कोल्हार खुर्द चिंचोली संयुक्त पाणी योजना ही केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. ही योजना जि. प. मार्फत अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याने सर्व कार्यवाही जि. प. कडून होत आहे. या दोन्ही गावांची ही योजना 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक होत असल्याने वस्तुतः निर्विघ्नपणे पार पाडणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये चिंचोली व कोल्हार खुर्द या गावांना स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्पासह नळ योजना आहे. दोन्ही गावांसाठी मात्र पाणी साठवण तलाव एकच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ती संयुक्तरित्या राबविली जाणार आहे.

या योजनेच्या निविदा निघाल्यानंतर पाणी साठवण तलावात काँक्रिटऐवजी पानकागद वापरला जाणार असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यावर बराच उहापोह झाला. यानंतर संबंधित अधिकारी ग्रामस्थांचे प्रश्नांचे समाधान करू न शकल्याने ही योजना आणखी संशयाच्या भोवर्‍यात अडकली. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ असा संघर्ष सुरू झाला. प्रशासन अधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मागणीला गांभीर्याने न घेतल्याने या चांगल्या योजनेला ग्रहण लागले. ही योजना पूर्ण झाल्यास गावचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. त्यामुळे अनेकांना ही योजना म्हणजे ‘अमृत संजीवनी’ वाटत आहे तर काही लोक ही योजना अर्धवट कशी राहील, यासाठी अंतर्गत विरोध करीत असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आम्ही कायदेशीर मार्गाने या अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी पुढे आलो आहोत, असे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिरसाठ यांनी यावेळी सांगितले.  या योजनेचा फायदा भविष्यकालीन चांगला होणार आहे. योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. ही योजना पूर्ण व्हावी व गावच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकावे, जेणेकरून पुढची पिढी सुखी होईल.
                                       दीपक पाटील, संचालक मुळा-प्रवरा वीज संस्था.

योजना दोन्ही गावांच्या हिताची आहे. यामध्ये काही त्रूटी असतील तर त्या दुरुस्त करून योजना पूर्णत्वास न्यावी, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
                                  अशोक गागरे, संचालक प्रवरा एज्युकेशन सोसायटी

Back to top button